नवी दिल्ली – तुम्हाला स्मार्टफोन, मोबाइलचे पार्ट्स किंवा ऍक्सेसरिज घ्यायचे आहेत का? मग घाई करा, तुमच्याकडे आजचाच दिवस आहे. १ एप्रिलपासून या सगळ्या गोष्टी महागणार आहेत. एखादा फोन आज जरी तुमच्या बजेटमध्ये असला, तरी उद्या तो असेलच असे नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्याच अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती. आयात शुल्कात वाढ झाल्याने हे दर वाढणार आहेत.
बघूया नेमकं काय महागणार आहे ते.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवरील आयात शुल्कात २.५ टक्क्यांची वाढ होणार आहे. सध्या हेच आयात शुल्क ७.५ टक्के आहे. त्यात वाढ होऊन १ एप्रिलपासून ते १० टक्के होणार आहे. या उत्पादनांमध्ये मोबाइल पार्ट्स, चार्जर, ऍडाप्टर, बॅटरी आणि हेडफोन्सचा समावेश आहे. म्हणजेच जर तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.
अर्थात, स्वस्त आणि बजेट रेंजचे जे फोन असतात, त्यांच्या किंमतीत फार वाढ होणार नाही. पण, तुम्हाला जर एकदम टकाटक फोन घ्यायचा असेल तर मात्र, तुमचे जास्त पैसे खर्च होऊ शकतात. कारण, कनेक्टर आणि कॅमेऱ्यात वापरल्या जाणाऱ्या PCBA वरील आयात शुल्क १५ टक्के करण्यात आले आहे. यामुळे अशा फोनच्या किंमती वाढणार आहेत.