नाशिक – माजी आमदार वसंत गिते व सुनील बागूल यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सायंकाळी हे नेते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी खा. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हे दोन्ही नेते सर्वांना परिचित आहे. ते चांगल्या वातावरणात घरी येत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला भक्कम बनेल. यासाठी या दोन्ही नेत्यांचे योगदान महत्त्वाचे असणार आहे.
या दोन्ही नेत्यांचे सर्वांनी मनापासून स्वागत केले. पक्षप्रवेश सोहळा म्हटला की, मतभेद असतात. पण, येथे कोणतेच मतभेद दिसले नाही. हे नेते भगव्या शालीखाली आले आहेत. त्यामुळे ही शाल अधिक ऊबदार होईल असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून गिते व बागूल यांच्याबरोबर चर्चा सुरू होती. उध्दव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर त्यांच्याशी अगोदर चर्चा केली. काल रात्री मी सुध्दा पुन्हा चर्चा केली. त्यानंतर हा प्रवेश सोहळा झाल्याचे ते म्हणाले.
दिनकर पाटील यांची भेट ठरली चर्चेचा विषय
गिते व बागूल यांच्या प्रवेश सोहळ्या अगोदर भाजपचे नेते दिनकर पाटील यांनी खा. राऊत यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तृळात त्याबाबतही चर्चा रंगली आहे.
भाजपला मोठा धक्का
महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी खा. संजय राऊत नाशिकला आले होते. दिवसभर त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांची उदघाटन झाली. सायंकाळी त्यांनी एका लग्नसोहळ्यात हजेरी लावली. त्यानंतर रात्री त्यांनी या दोन नेत्यांशी एका हॅाटेलमध्ये चर्चा करुन या प्रवेश सोहळ्यावर शिक्कामोर्तब केले. शुक्रवारी या नेत्यांचा प्रवेश सोहळा झाला.