- शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन महापौर
- भाजप स्वतंत्र गटाचे कुलभूषण पाटील उपमहापौर
- घडामोडींचे केंद्र ठाणे येथील बाईक रिसोर्ट
- सांगली पाठोपाठ जळगाव मनपातून भाजप पायउतार
- सौ. महाजन, सोनवणे यांना प्रत्येकी ४५ मते
- सभागृहात अखेरपर्यंत भाजपचा रडीचा डाव
- ……………………………………………………….
- दिलीप तिवारी, ठाणेBattle Ground Byke Suraj Plazza Thane …
जळगाव महानगरपालिकेतून भाजपची सत्ता नगरसेवकांनी ठरवून बाहेर काढली. भाजपतील स्वतंत्र गटाच्या सहकार्याने (२७ नगरसेवक) व एमआयएमच्या मदतीने (३ नगरसेवक) आणि शिवसेनेचे १५ नगरसेवक असे बहुमताचे ४५ मतदान घेऊन महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी भाजप स्वतंत्र गटाचे कुलभूषण पाटील हे विजयी झाले. महापौरपदासाठी विरोधात असलेल्या भाजपच्या प्रतिभा रामचंद्र कापसे व उपमहापौरपदासाठी सुरेश सोनवणे यांना केवळ ३० मते मिळाली. एकूण ७५ नगरसेवकांमध्ये भाजपचे संख्याबळ ५७, शिवसेनेचे १५ आणि एमआयएमचे ३ आहे. निवडणुकीपूर्वी भाजपतील २७ नगरसेवकांचा एक गट स्वतंत्र झालेला आहे. याच गटाने शिवसेनेसोबत युती करून भाजपचा पराभव घडवून आणला.
जळगाव मनपा सभागृहात उपस्थित असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी अनेक प्रकारे मतदानात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. काही नगरसेवकांनी निवडणूक प्रक्रियेला हरकत घेतली. सुरुवातीला पिठासीन अधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व आक्षेप फेटाळले. नंतर त्यांनी कठोरपणे सांगितले की, उच्च न्यायालयाची फरवानगी आणि महसूल आयुक्तांचे आदेश यानुसारच प्रक्रिया होते आहे. आता मतदान देणारा आणि त्याने नोंदवलेले मत सर्वांना दिसते आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा आणू नये. महापौर निवड सभा आॉनलाईन असल्यामुळे भाजप सदस्य तंत्रातील अडथळ्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत होते.
जळगाव मनपाच्या महापौर व उपमहापौर निवडीची आजची आॕनलाईन सभा ऐतिहासिक ठरली. नाशिक विभाग आयुक्तांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी आजची विशेष सभा आॕनलाईन घ्यायचे आदेश दिले होते. त्यानुसार पिठासीन तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नियोजन केले होते. मात्र भाजपने आॕनलाईन सभेच्या कार्यवाहीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात आक्षेप घेतला होता. मात्र शिवसेनेतर्फे प्रशांत नाईक प्रतिवादी झाले. त्यांनी न्यायालयात वस्तुस्थिती मांडली आणि न्यायालयाने बाजू ऐकून घेत भाजपची याचिका निकाली काढली.
त्यामुळे आज होणाऱ्या विशेष सभेची पूर्तता जिल्हा, मनपा प्रशासनाने केली. त्याचवेळी शिवसेना, एमआयएम व भाजप स्वतंत्र गटाचे बहुमताच्या संख्येचे नगरसेवक ठाणे येथील बाईक रिसोर्ट येथे होते. तेथेही तीन कक्षात ४५ नगरसेवक लॅपटॉपचा वापर करून आॕनलाईन मतदान करू शकतील अशी यंत्रणा तयार करण्यात आली. या सर्व नियोजनावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी शहरप्रमुख गजानन मालपूरे यांचे लक्ष होते. शिवसेनेचे इतर नगरसेवक व समर्थक मंडळी रात्री ठाण्यात पोहचले.
आॕनलाईन सभेला सकाळी ११ पासून प्रारंभ झाला. सभेची लिंक मनपा प्रशासनातर्फे प्रभागनिहाय नगरसेवकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आली होती. यासाठी गुगल मीट या ॲपचा वापर केला गेला. आॕनलाईन मतदानासाठी नगरसेवकांची ओळख नगरसचिवांना करता यावी म्हणून लॅपटॉपचा वापर केला गेला. प्रत्येक नगरसेवकाचा मोबाईल लॅपटॉपला जोडलेला होता. सभेचे केंद्रबिंदू तीन ठिकाणी होते. मनपा सभागृहात महापौर व सूचक, अनुमोदक होते. दुसरीकडे भाजपचे काही नगरसेवक इतर ठिकाणाहून (बहुधा नाशिकहून) सहभागी झाले. शिवसेना, भाजप स्वतंत्रगट व एमआयएमचे नगरसेवक तसेच उपमहापौरपदाचे उमेदवार कुलभूषण पाटील हे ठाणे येथून सहभागी झाले.
मतदान प्रक्रिया पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, आयुक्त कुलकर्णी, नगर सचिव सुनील गोराणे यांच्या निरीक्षणात सुरू झाली. राऊत यांनी अगोदर सभेचा कोरम पाहण्यासाठी प्रभाग निहाय नगरसेवकांची उपस्थिती नोंदवली. त्यानंतर महापौर व उपमहापौरपदासाठी आलेल्या उमेदवार अर्जाची छाननी झाली. तेव्हा ॲड. सूचिता हाडा, भगत बालाणी यांनी हरकत घेतली. राजेंद्र घुगे पाटील यांनी सांगितले की महाजन व पाटील यांचे अर्ज गॅझेटनुसार नाही. त्यामुळे त्यांचे अर्ज बाद करण्याची मागणी केली. पिठासन अधिकाऱ्यांनी या हरकती फेटाळल्या. मतदान सुरू करताना भाजपकडून होणाऱ्या विलंबासाठी नीतीन लढ्ढा, ललीत कोल्हे, विष्णू भंगाळे, प्रशांत नाईक, नीतीन बर्डे, सरिता नेरकर त्यानंतर पात्र उमेदवारांची रिंगणात नावे क्रमाने वाचून दाखवली. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीसाठी निश्चित वेळ दिला. कोणीही माघार न घेतल्यामुळे आॕनलाईन मतदान नोंदवणे सुरू झाले. यासाठी प्रत्येक प्रभागातील घटक निहाय नगरसेवकांचे नाव पुकारले गेले. महापौर पदासाठी रिंगणातील उमेदवारांची नावे सांगून तुम्ही कोणाला मत देता ? की तुम्ही तटस्थ राहणार ? हे विचारले. त्यावर नगरसेवकांनी आपले मत कोणाला हे सांगितले. ही प्रक्रिया फारच वेळ घेणारी ठरली. मात्र अंतिम निकाल १ वाजता समोर आला. महापौरपदासाठी जयश्री सुनील महाजन यांना ४५ मते मिळवून त्या विजयी झाल्याचे पिठासीन अधिकारी राऊत यांनी घोषित केले. महापौर निवडीनंतर उपमहापौर निवड प्रक्रियाही अशीच झाली. अंतिम निकाल २.३० वाजता समोर आला.
जळगाव मनपातील या सत्तांतरामुळे महाराष्ट्रातील एक मोठी महापालिका, व्यापारी पेठेचे व उद्योगनगरी, सुवर्णनगरी अशी ओळख असलेले शहर शिवसेनेच्या ताब्यात आले. विशेष म्हणजे हे सत्तांतर शिवसेनेचे नेते व स्थानिक शिलेदारांनी स्वबळावर घडवून आणले. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस वा काँग्रेसची मदत शिवसेनेला लागली नाही. कारण जळगाव मनपात या दोन्ही पक्षांचा एकही नगरसेवक नाही. शिवसेनेचा हा विजय इतर ठिकाणी आत्मविश्वास देणारा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत, रावेर मतदार संघ संपर्क प्रमुख विलास पारकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे जळगाव मनपातील भाजपची सत्ता पायउतार झाली.
शिवसेनेच्या या विजयाने विधी मंडळातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी गिरीश महाजन यांना थेट शह दिला आहे. फडणवीस यांनी जळगाव मनपाला विशेष अनुदान १२५ कोटी दिले होते. पण गिरीश महाजन व त्यांचे भाजपचे नगरसेवक हा निधी वेळेत खर्च करून विकास कामे करू शकले नाहीत. गिरीश महाजन जळगाव शहरासाठी वेळ देत नव्हते, आमदार सुरेश भोळे स्वतःपुरते पाहतात अशा तक्रारी करीत नाराज असलेल्या नऊग्रह मंडाळासह इतर नगरसेवकांनी भाजपला सत्तेतून खाली खेचले. शिवसेनेने एक राजकीय हिशेब चुकता केला.
जळगाव मनपावर शिवसेनेचा झेंडा फडकल्यामुळे आता मनपातील सत्तेचे कारभारी नीतीन लढ्ढा, सुनील महाजन, नीतीन बर्डे, ललित कोल्हे, कुलभूषण पाटील, सुनील खडके सहनऊग्रह मंडळ आदींना आता थेट मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांचा थेट संपर्क उपलब्ध होणार आहे. याचा लाभ शहर विकासासाठी घेण्याचे कौशल्य अनुभवी नेत्यांना दाखवावे लागेल.
ठाण्यात विजयाचा जल्लोष
महापौरपदी शिवसेनेच्या सौ. जयश्री महाजन विजयी झाल्यानंतर हॉटेल ठाणे येथे बाईक सुरज प्लाझामध्ये नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. येथे जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख विलास पारकर, नीतीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, नीतीन बर्डे, ललीत कोल्हे, गजानन मालपूरे, नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, गजानन देशमुख, कुंदन काळे, चेतन सनकत, सुधीर पाटील, दिलीप पोकळे, अमर जैन, सरीता माळी, विराज कावडीया, अमित जगताप, पियुष हसवाल यांच्यासह शिवसेना, भाजप नगरसेवकांनी जल्लोष केला.