नाशिक – अंजनेरी परिसरातील मुळेगावपासून ते थेट माथ्यापर्यंत प्रस्तावित १४ किमीचा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव मागे घ्या, अशी कळकळीची विनंती नाशिकमधील पर्यावरणप्रेमींनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे केली आहे. त्यास आता गोडसे काय प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पर्यावरण प्रेमींनी गोडसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आपल्या मतदारसंघातील नागरिक या नात्याने नम्र विनंती करत आहोत की, अंजनेरीचे धार्मिकदृष्ट्या ज्याप्रमाणे महत्त्व आहे. अगदीच त्याचप्रमाणे नैसर्गिक जैवविविधतेच्या समृध्दतेबाबत सुद्धा आहे. या ठिकाणी असलेल्या राखीव वनाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठीच शासनाने तीन वर्षांपूर्वी या अंजनेरी वनाला ‘राखीव संवर्धन वनक्षेत्र’ असा महत्वाचा दर्जा दिला आहे. यामुळे प्रस्तावित रस्त्याचा प्रस्ताव वजा अट्टहास आपण सोडावा आणि नाशिककरांवर एक महत्त्वाचे उपकार करावे, एवढेच आपणांस मतदार या नात्याने सांगू इच्छितो. आपण सुज्ञ लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे आपण याबाबत चांगले जाणून आहात, यात आम्हाला शंका नाही. आपण आमच्या विनंतीचा विचार करुन शाश्वत विकासाच्या नजरेतून बघत योग्य तो निर्णय घ्याल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
रस्त्याचा हट्ट का
खासदार गोडसे यांचा या रस्त्यासाठी हट्ट का आहे, याबाबत पर्यावरणप्रेमी सध्या प्रश्न विचारत आहेत. या भागात गोडसे यांनी जमिनीत गुंतवणूक केली असून त्यासाठीच रस्त्याचा घाट घातला जात असल्याचे काही पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
मोहिमेला मोठा प्रतिसाद
अंजनेरी बचावच्या मोहिमेला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध संस्था-संघटना यासाठी एकत्र आल्या आहेत. या सर्वांकडून प्रस्तावित रस्ता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह वनविभागाला निवेदन दिले जात आहे.