नाशिक – पीक कर्ज देण्यात खासगी बँका चालढकल करीत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. चालू आठवड्यात एचडीएफसी बँक, कोटक बँक, युबीआय बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र इत्यादी बँकानी कर्ज वाटपाबाबतचे कामकाज असमाधानकारक केले आहे. त्यामुळे या बँकांना नोटिस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रणी बँक व्यवस्थापकांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, अग्रणी बँकेचे अधिकारी दिलीप सोनार, राष्ट्रीयकृत बॅक, खासगी बँक, व्यापारी बँक व ग्रामीण बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात आजपर्यंत ५२ हजार १३२ शेतकऱ्यांना १ हजार ३६२ कोटी खरीप पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिली. जिल्हाधिकारी म्हणाले की, खरीप पीक कर्ज वाटपात सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी चालू आठवड्यात कर्जवाटपाचे चांगले काम केले असून त्यांना १०५ कोटी ९४ लाख एवढे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी या बँकेने ६२ कोटी ७ लाख रुपये इतक्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.
या बँकांनाही सुनावले
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील लाभार्थ्यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकानी कमी प्रमाणात कर्ज वाटप केले असून या सर्व बँकानी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर कर्ज करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.