नाशिक – येत्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. त्यामुळे फक्त शासकीय व निमशासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर सुरु ठेवण्यात येवून शाळा, महाविद्यालये व खाजगी ठिकाणी सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर्स बंद करण्यात यावी. आणि तेथील मनुष्यबळ व साधन सामुग्रीचा वापर इतर आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात महिन्याभरापुर्वी ३ हजार ४२३ रुग्णसंख्या होती. आज रुग्णसंख्या १ हजार ७०१ अर्थात निम्म्यावर आली आहे. जिल्ह्याचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्याच्या सरासरी पेक्षा ३ टक्क्यांनी अधिक असून जिल्ह्याचा मृत्यूदर देखील १.६५ टक्के इतका आहे.
जिल्ह्यात सुरू ठेवण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटर्समध्ये संभाव्य परिस्थितीचा विचार करून व पूर्व नियोजनाच्या अनुषंगाने साधारण चार हजार रुग्णांची सोय होईल अशा पद्धतीने व्यवस्था कायम ठेवण्यात यावी. या अनुषंगाने करण्यात आलेल्या व्यवस्थेचा अहवाल संबंधित विभागाने जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.