मुंबई/नाशिक – दसरा, दिवाळी सणानंतर गोडे तेलाच्या दरात सातत्याने सतत वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात तर खाद्यतेलाची सुमारे ३० टक्के भाववाढ झाली आहे. खाद्यतेल ही जीवनावश्यक वस्तू असल्याने त्याचा थेट व मोठा परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे.
खाद्यतेल व किराणा मालाच्या दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे नवी दिल्ली येथे २८ नोव्हेंबर पासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन. या आंदोलनामुळे शेतमाल वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला असून सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल आदी तेलबिया वर्गीय पिकांची देशांतर्गत तेलाच्या कारखान्यात वाहतुकीस विलंब होत आहे, त्यामुळे पुरवठा वेळेवर होत नसल्याने तेलांची खाद्यतेलाची कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे.
अत्यावश्यक सेवा म्हणून किराणामाल दुकानात अन्नधान्यांसह डाळी आणि गोडेतेलाच्या दरात सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पुरेसा किराणा माल येत नसल्याने तसेच होलसेल मध्ये जादा दराने खरेदी करावी लागत असल्याने आम्हाला भाववाढ करावी लागली, असे किरकोळ विक्री करणाऱ्या किराणा दुकानदारांचे म्हणणे आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढल्याचा परिणाम वाहतूक खर्चावरही झाला आहे. परिणामी किराणा मालाचे दरही वाढले आहेत, त्यास किराणा दुकानदारांनी दुजोरा दिला आहे.
ही आहेत कारणे
शेतकरी आंदोलनामुळे रस्ते बंद असल्याने अपुरा होणारा मालाचा पुरवठा, मजुरांची टंचाई, वाहतूक करताना होणारा खोळंबा, मालाची ने-आण करण्यासाठी ठिकठिकाणी अडथळा, लांबच्या मार्गाने करावी लागणारी वाहतूक आदी कारणे गोडे तेलाचे दर वाढण्यामागे असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
—
तेलाचे दर असे
महिनाभरापूर्वीचे दर व आताचे दर (१ लिटर पाऊच)
सूर्यफूल तेल : १०० ते ११०—- १२५ ते १३०
शेंगदाणा तेल : १४० ते १५०—— १६५ ते १७०
सोयाबीन तेल : १०० ते ११०—— १२५ ते १३०