विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
नवी दिल्ली – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॅा. भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय देण्यात आले आहे. तर भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ही महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्यातील या मंत्र्याबरोबरच देशातील इतर मंत्र्याचे खाते वाटप करण्यात आले आहे. त्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहे. तर आरोग्य खात्याचा पदभार आता मनसुख मांडवीय यांच्याकडे देण्यात आला आहे. त्याचबरोबर मांडवीय यांच्याकडे खते आणि रसायन मंत्रालयही असणार आहे. तर अश्विनी वैष्णवर यांच्याकडे रेल्वे खातं देण्यात आले आहे. त्याचबरोबर माहिती आणि तंत्रज्ञान खातेही वैष्णव यांच्याकडे असणार आहे. स्मृती इराणी यांच्याकडे फक्त महिला व बालविकास खात्याची जबाबदारी राहणार आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याची अतिरिक्त जबाबदारी पंतप्रधानांकडे असणार आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रीपद देण्यात आले आहे. तर हरदीपसिंह पुरी यांच्याकडे पेट्रोलियम खाते देण्यात आले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे नागरी उड्डयण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे मत्स्य आणि दुग्धविकास मंत्रालय देण्यात आले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय, त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्रालय असणार आहे. केंद्रीय राज्यमंत्रीपदावरुन कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेल्या अनुराग ठाकूर यांच्याकडे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर माहिती आणि प्रसारण खात्याची जबाबदारीही त्यांना देण्यात आली आहे. गिरीराजसिंह यांच्याकडे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पशुपती पारस यांच्याकडे अन्न व प्रक्रिया मंत्रालय सोपवण्यात आले आहे. भुपेंद्र यादव यांच्याकडे केंद्रीय कामगार आणि पर्यावरण मंत्रालय देण्यात आली आहे. तर केंद्रीय राज्यमंत्री मुंजपारा यांच्याकडे महिला व बालविकास खाते देण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयासह कायदा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे ईशान्य विकास आणि आयुष मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.