जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची घोषणा
नाशिक : संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात संसर्ग बाधितांची संख्या देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत खाजगी गुंतवणुकीतून भावली धरण परिसरात पर्यटनाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
ते भावली ता. इगतपुरी धरण परिसराला पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याबाबत पाहणी करण्यासाठी आले असताना बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडखे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले, भावली धरण पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय चांगले आहे, या ठिकाणी पर्यटक सुटीच्या दिवशी आनंद घेतात. या बाबींचा विचार करता या ठिकाणी धबधबे, रोप-वे, बोटिंग, वेलनेस सेंटर आदी पर्यटनास अनुकूल अशा गोष्टींचा उपयोग करून विकास करता येणे शक्य आहे. या भागांमध्ये जलसिंचन विभागाच्या तसेच खासगी जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. खाजगी संस्था अथवा व्यक्तींनी या जागा भाडेपट्टीवर घेऊन या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने प्रकल्प राबविल्यास शासन त्याचे स्वागत करेल. राज्यातील अनेक ठिकाणी अशा पर्यटन स्थळ विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अवैध मासेमारी करणाऱ्यांविरोधात जलसंपदा विभागाने फौजफारी तक्रार दाखल करावी,अशी सूचना मंत्री श्री. पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. तसेच स्थानिकांनी देखील या अवैध मासेमारी करणाऱ्यांविरोधात शासनाला माहिती पुरविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्यामध्ये सध्या कोरोणा संसर्गित जिल्ह्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन या विषाणूला मात कशी देता येईल, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. या परिस्थितीत आपले शास्त्रज्ञ, कोरोना योद्धे सतत या परिस्थितिचा सामना करत आहेत. ते देवासमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.