नवी दिल्ली – नवी दिल्लीतील तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला लग्न करण्याची इच्छा आहे. मुलगी सुद्धा तयार आहे. परंतु समस्या ही आहे, की तो वऱ्हाडी मंडळींचा खर्च करण्यास असमर्थ आहे. ही वऱ्हाडी मंडळी दुसरे-तिसरे कोणी नसून पोलिस आहेत.
सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला तरीही गेल्या सहा महिन्यांपासून नवरदेव लग्नाची वाट पाहतोय. पोलिसांनी दोषी विशालला लग्नाला जाण्यापूर्वी अडीच लाख रुपये जमा करण्यास सांगितलं आहे. हे अडीच लाख रुपये त्याच्यासोबत दोन दिवस राहणाऱ्या सहा पोलिसांचा खर्च आहे.
न्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायाधीश एम आर शाह यांच्या खंडपीठानं शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी घेतली. हत्येच्या एका प्रकरणात विशालला जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली असून, विशालला न्यायालयानं त्याला अडीच लाख रुपये जमा करण्यास सांगितलं आहे. परंतु, विशाल एवढी मोठी रक्कम देण्यास सक्षम नाही, असं त्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.
विशालवर लक्ष ठेवण्यासाठी दोन पोलिस पुरेसे असून, त्यांचा खर्च तो करण्यास तो तयार आहे. पण खंडपीठानं त्याला दिलासा देण्यास नकार दिला. विशालवर अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असलेले गुन्हे आहेत असं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलं. दोनच पोलिस पुरेसे आहेत, हे आपण कसं म्हणू शकतो. पोलिसांचा खर्च त्याला करावाच लागेल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
सप्टेंबरमध्येच लग्नाला परवानगी
विशालनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यानं असं म्हटलं होतं की, तो त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करू इच्छितो. न्यायालयानं त्याला १५ सप्टेंबरला लग्न करण्यासाठी दोन दिवसांसाठी अंतरिम जामीन दिला होता. सोबतच साध्या वेषात पोलिसांना त्याच्यासोबत राहण्याचे आदेशही दिले होते. पोलिसांचा खर्चही त्याने करावा असं न्यायालयानं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी अडीच लाखांचं बिल त्याच्या हाती दिलं. त्याविरोधात त्यानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.