नाशिक – भारत-चीन सीमेवर तणाव असतानाच पाकिस्तानच्या हेराने नाशकातील लष्करी भागात हेरगिरी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्याने येथील काही फोटो थेट पाकिस्तानात व्हॉटसअॅपद्वारे पाठविल्याने ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. या परप्रांतीय हेरास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, बिलाल शेखने यापूर्वी नाशिकमध्ये पोलिस अकादमीची हेरगिरी केल्याचे प्रकरण आहे. त्यामुळे आता हे प्रकरणही देशपातळीवरच गाजण्याची चिन्हे आहेत.
देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्प स्कूल ऑफ आर्टिलरीच्या सैनिकी रुग्णालयात एक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून रोजंदारीवर काम करीत होता. हेरगिरी करण्याच्या संशयावरुन देवळाली कॅम्प पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचे नाव संजीव कुमार (वय २१) असे आहे. कुमार हा रोजंदारी कामावर एक महिन्यापासून काम करत होता. शनिवारी (दि. ३) सकाळी गेटवरील लष्करी जवानांनी सदर मजुराची तपासणी केली. त्याच्या मोबाईलमध्ये लष्करी विभागाचा फोटो दिसून आला. विशेष म्हणजे, हा फोटो पाकिस्तानातील एका व्यक्तीला व्हाट्सॲपवर पाठविण्यात आल्याचे आढळून आले. याची गंभीर दखल घेत सुभेदार ओंकार नाथ यांनी तात्काळ संशयितास ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली.
लष्करी अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी या इसमाची सखोल चौकशी करीत आहेत. लष्करी विभागात मोबाईल वापरण्यास बंदी आहे. त्यातच आर्टीलरी सेंटरमध्ये लष्कराचे तोफांचे प्रशिक्षण केंद्र आहे. तसेच अन्य विभागही आहेत. सध्या भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती असताना नाशकात लष्करी विभागात हेरगिरीचा प्रकार उघड झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाकिस्तानकडून हेरगिरीसाठी कुमारला नियुक्त करण्यात आले की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, सहायक पोलीस निरीक्षक आर.टी. मोरे अधिक चौकशी करत आहेत.
यापूर्वी बिलालकडून हेरगिरी
नाशिकमध्येच असलेल्या महाराष्ट्र पोलिस अकादमीची हेरगिरीचे प्रकरण यापूर्वी घडले आहे. अतिरेकी बिलाल शेख याचा हा कारनामा उघड झाला. त्यामुळे नाशिक हे हेरगिरीत राष्ट्रीय पातळीवर समोर आले होते. त्याला अटक करण्यात आल्यानंतर हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. बिलालच्या प्रकरणानंतर आता परप्रांतीयाकडून पाकिस्तानी हेरगिरी झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.