– गेल्या वर्षापेक्षा ९५९ कोटी रुपयांनी जास्तीचे वितरण करून गेल्या चार वर्षातील कर्ज वितरणाचा गाठला उच्चांक
-
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली माहिती
-
नाशिक -चालू आर्थिक वर्षात (2020-21) खरीप पिकांसाठी 2 हजार 300 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून गेल्या वर्षापेक्षा ( 2019-20) हे 959 कोटी रुपयांनी जास्तीचे असून गत चार वर्षातील हा खरीप पीक कर्ज वितरणाचा उच्चांक असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज 2021-22 ह्या आर्थिक वर्षासाठीचा पतपुरवठा योजनेच्या नियोजनाबात चर्चा करण्यासाठी आयोजित बॅंकर्सच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. मांढरे बोलत होते. यावेळी जिल्हा लीड बँक व्यवस्थापक अर्धेंदू शेखर, एसबीआय बॅकेंचे क्षेत्रिय सहायक महाप्रबंधक सफल त्रिपाठी, जिल्हा उपनिबंधक सतिश खरे, एनडीडीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश पिंगळे यांच्यासह इतर बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याबाबत पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले की, यात मागील 4 वर्षांचा शेती कर्जांचा आढावा घेतला असता 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 959 कोटी रुपयांनी अधिक पीक कर्ज वितरण झाले आहे. जिल्ह्यात पीक कर्ज वितरणात वाढ झाली असली तरी जिल्ह्यात शेतीची मुबलक कामे असल्याने त्यात वाढीची शक्यता अधिक आहे. तसेच शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेवर करून किंवा नूतनीकरण करून व्याज परताव्याचा लाभ घ्यावा, ज्यामुळे जिल्ह्यातील पतपुरवठ्यास चालना मिळेल व जिल्ह्यातील शेती उद्योगातील प्रगतीत सर्वसमावेशक वाढ होईल.
बॅंकांनीही एक वास्तववादी लक्ष्य निश्चित करावे, जे जिल्ह्याची पीक कर्जाची आवश्यकता तसेच बँकांना दिलेल्या उद्दिष्टांना प्रतिबिंबीत करेल आणि येणाऱ्या आर्थिक वर्ष 2021-2022 साठी सूक्ष्म विश्लेषण करण्यासाठी ते प्रभावी ठरेल. हे उद्दिष्ट हे शाखांची संख्या, प्रसार आणि गतिशीलता, लागवडीखालील जमीन आणि पिकाच्या उत्पादनास चालना देणारे व शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासीठी प्रेरित करणारे असावे, असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी सांगितले.