त्र्यंबकेश्वर – कोरोनाच्या संकटाबरोबरच त्र्यंबकवासियांना सध्या खड्ड्यांच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. शहराकडे येणारे तसेच शहरातील सर्व रस्ते खड्ड्यांनी भरल्याने शहरवासियांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
त्र्यंबक नगरपालिकेकडून सर्वसामान्य सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्र्यंबक शहरात प्रवेश करणा-या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. पाऊस कोसळायला लागला तसे त्यांची व्याप्ती वाढली आहे. या खड्डयांमध्ये पाणी साचते आहे. दुचाकी स्वारांना त्याचा अंदाज न आल्याने अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. शहरात प्रवेश करण्यासाठी एकमेव असलेला कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या समोरील रस्त्याचीही अत्यंत दयनीय अवस्था आहे. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने दुचाकीस्वारांना खड्ड्यांमधूनच मार्ग काढावा लागत आहे. खड्डयांमध्ये कच किंवा खडी टाकून तात्पुरते खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.