नाशिक – पावसामुळे शहरातील रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. महापालिकेच्यावतीने त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आणि त्यांना आंदोलन केले. पेठरोड येथील राऊ हॉटेलच्या ठिकाणी शिवसेनेच्या विद्यार्थी सेना महिला आघाडीच्यावतीने खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. “खड्डे बुजवा, खड्डे बुजवा”, “आव्वाज कुणाचा शिवसेनेचा!!”, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शिवसेनेच्यावतीने महानगरपालिकेविरोधात खड्डे मुक्त रस्त्यासाठी प्रभाग १ मधून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. महानगर प्रमुख महेश बडवे यांच्या नेतृत्वाखाली राहू हॉटेल चॉफुली येथे मखमालाबाद म्हसरूळ लिंक रोड वर खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी बडवे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. प्रभाग १ मधील नगरसेविका ३ वर्षे महापौर होत्या. तसेच दुसऱ्या नगरसेविका पंचवटी प्रभाग समिती सभापती होत्या. तिसरे नगरसेवक सद्ध्या स्थायी समिती सभापती आहेत. असे असताना प्रभाग १ ची ही अवस्था आहे. तर इतर ठिकाणची काय अवस्था असेल, अशी टीका बडवे यांनी केली.
आंदोलनात विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे, दिलीप मोरे सुनिल निरगुडे, संजय पिंगळे, चांगदेव गुंजाळ, शैलेश सूर्यवंशी, विशाल कदम, स्वाती पाटील, सुरेश जाधव, विनोद हाटकर, गणेश थेटे, संतोष पेलमहाले, रविंद्र आव्हाड, स्वप्निल जाधव, गणेश डापसे, बाळू घाटोळ, अंकुश काकड, कल्पेश पिंगळे, प्रवीण पूजारी, महेश कर्पे, सौरव गोडे, विकास पिंगळे, आदी शिवसैनिक व महिला आघाडी च्या पदाधिकारी तसेच युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.