भोपाळ (मध्य प्रदेश) – ग्वाल्हेरचे राज्यसभेतील खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या जयविलास महालात चोरी झाल्यानं खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षकांचा खडा पहारा असतानाही चोरी झाल्यानं सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे. ज्योतिरादित्य शिंदे ग्वाल्हेर दौर्यावर आल्यास ते याच महालात राहतात.
जयविलास महालात चोरी झाल्याचं कळताच मोठे पोलिस अधिकारी धास्तावले असून, त्वरित घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांसोबत फॉरेन्सिक लॅबची टीमही घटनास्थळी पोहोचली असून, चोरी झालेल्या भागातून हाताचे ठसे आणि पुरावे गोळा करत आहे. श्वानपथकाकडूनही चोरांचा माग काढण्यात येत आहे. महालातून काय चोरी झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. जयविलास महालातील राणी महालाच्या एका खोलीच्या छतावरून चोर आतमध्ये आले होते, असं सीएसपी रमेश तोमर यांनी सांगितलं. खोलीमध्ये मोडतोड करण्यात आली असून सामान अस्ताव्यस्त करण्यात आलं आहे. महालात किती चोर आले त्यांनी काय चोरी केलं, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.
असा आहे जयविलास महाल
जयविलास पॅलेस हा ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा महाल आहे. हा महाल १२ लाख स्क्वेअर फुटांहून अधिक आहे. या महालाची किंमत जवळपास ४ हजार कोटी रुपये आहे. महालात ४०० हून अधिक खोल्या आहेत. त्यातील एक भाग राजघराण्याचा इतिहास दाखवण्यासाठी संग्रहालय म्हणून वापरला जातो. या महालाच्या चारही बाजूने सुरक्षारक्षकांचा वेढा असतो. म्हणूनच चोरी झाल्यानं खळबळ उडाली आहे.