जळगाव – भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरानंतर हळूहळू भाजपला खिंडार पाडत आहेत. खडसेसमर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू लागले आहेत. भुसावळमधील ३१ आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात बांधलं आहे, यामध्ये १८ विद्यमान आणि १३ माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा झाला. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यामागे ईडीकडून चौकशीचा ससेमीरा लागला होता. दुसरीकडे मला जितकं छळाल, तितकं भाजपला महागात पडेल, असा इशारा खडसे यांनी दिला होता. त्यांचा हा इशारा सूचक मानला जात होता.










