जळगाव – भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या आपल्या प्राथमिक पक्ष सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या या चर्चेला आता विराम मिळाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता आपल्या समर्थकांसह ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंगळवारी मुक्ताईनगरमध्ये भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण…तुम्ही ठरवाल तेच धोरण अशा मजकुराचे बँनर झळकले होते. त्यात भाजपचे कमळही नव्हते. त्यामुळे त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात होता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहे. त्यांच्याबरोबर त्यांची कन्या व जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे प्रवेश करणार आहे.
विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया
खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या निर्णयाचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वागत केले तर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप राजीनामा दिल्याची अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे सांगितले. खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर नाराजी नसल्याचे सांगून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
मुक्ताईनगरमध्ये जल्लोष
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची पत्रकार परिषदेत घोषणा केली. त्यापाठोपाठ एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मुक्ताईनगरमध्ये त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
कोणी आमदार व खासदार नाही
खडसे यांच्याबरोबर अनेक आमदार व खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. पण, खडसे यांनीच माझ्याबरोबर कोणीच आमदार व खासदार प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले.
शेवटपर्यंत प्रयत्न केले – चंद्रकांत पाटील
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
पाटील म्हणाले की, खडसे यांचा राजीनामा माझ्याकडे आला आहे. खडसे यांनी पक्षात राहावे अशीच आम्हा सर्वांची भूमिका होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. कितीही रागावले तरी ते पक्ष सोडतील असे वाटत होते. त्यांच्या नाराजीच्या मुद्द्यांवर काही ना काही मार्ग निघेल असे वाटत होते. आज सकाळीही मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. ते ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी चांगले काम करावे यासाठी त्यांना शुभेच्छा. खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्याबाबत मी काही बोलणार नाही , असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले.