नवी दिल्ली – कोविड परिस्थितीमुळे बरेचसे खटले प्रलंबित राहिले असून, ही परिस्थिती निवळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहिलेल्या या खटल्यांचा वेगानं निवाडा करणं कठीण जाणार आहे. त्यामुळे यातले काही खटले त्यांच्या स्वरुपानुसार मध्यस्थीच्या मार्गानं सोडवण्याची गरज आहे. खटले मोठ्या प्रमाणावर साचून राहिल्यामुळे, खटल्यांचे निवाडे लवकर लागले नाहीत तर आत्महत्यांचं प्रमाण वाढू शकते, अशी भीती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश, न्यायमूर्ती आर भानुमती यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या व्हर्च्युअल प्रकाशन समारंभात ते नवी दिल्लीत बोलत होते. म्हणूनच प्रलंबित राहिलेल्या या बऱ्याच प्रकरणांपैकी, काही प्रकरणात, खटला दाखल होण्याच्या आधी तर काहीत, खटला दाखल झाल्यानंतर सुद्धा, मध्यस्थी करुन परस्पर सहमतीनं मार्ग काढता येऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.