नवी दिल्ली – भारत, अमेरिका, जपान आणि अॉस्ट्रेलिया या क्वाड देशांची पहिली बैठक आज होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्हर्च्युअल बैठकित हिंद–प्रशांत क्षेत्राला स्वतंत्र, मुक्त आणि समावेशक बनविण्यासाठी सहकार्य करण्यावर चर्चा करतील.
क्वाड देशांची ही बैठक समकालीन आव्हानांशी संबंधित मुद्यांवर विचारांचे आदान–प्रदान करण्यासाठी होत आहे. उदाहरणार्थ पुरवठा साखळी, नवतंत्रज्ञान, सागरी सुरक्षा, हवामान बदल या मुद्यांवर चर्चा होईल. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान योशहिदे सुगा आणि आस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची उपस्थिती असेल.
चारही राष्ट्रांच्या एकमेकांशी संबंधित क्षेत्रीय हितांवर यावेळी चर्चा होईलच, शिवाय काही वैश्विक मुद्यांवरही विचारांचे आदान–प्रदान होईल. यादरम्यान कोरोना महामारीचा सामना करणे आणि भारत–प्रशांत क्षेत्रात सुरक्षित, समान आणि स्वस्त व्हॅक्सीनची उपलब्धता सुनिश्चित करण्याबाबत सहकार्य करण्याचा मुद्दाही चर्चेला येईल.
चीनवर अवलंबून न राहण्याचा मुद्दा
या बैठकीत चीनवर उत्पादनांच्या पुरवठ्याच्या बाबतीत अवलंबून न राहण्याचा मुद्दाही चर्चेला येणार आहे. चीनवर कमीत कमी कसे अवलंबून राहता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले जाईल.
जगभरातील ६० टक्के दुर्मिळ धातूचे उत्पादन चीनमध्ये होते. त्यामुळे अनेक देशांना चीनवर अवलंबून राहावे लागते. जवळपास सर्व देशांमधील बाजारपेठेवर चीनची पकड मजबूत आहे. क्वाड देशांच्या चर्चेत उत्पादनांच्या नव तंत्रज्ञानावर विचार होईल.