मुंबई – अनेकदा क्रेडिट स्कोर चांगला असूनसुद्धा कर्ज मिळणे शक्य होत नाही. याची काही कारणे आहेत. कर्ज देणारे कोणतेही संस्थान किंवा कर्जदाता कर्ज मंजूर करण्या आधी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण चौकशी करत असतो. कर्जासाठी अर्ज करणारा व्यक्ती हा कर्जासह व्याजाची पूर्ण रक्कम वेळेत देईल किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग केला जातो. ही माहिती घेत असताना कधीकधी कर्ज मंजुरीस वेळ लागतो, तर कधीकधी कर्ज देण्यास नकारसुद्धा दिला जाऊ शकतो.
चला जाणून घेऊया की क्रेडीट स्कोर चांगला असून देखील तुमचे कर्ज नाकारले जाऊ शकण्याची कारणे…
उत्पन्न
जर तुमचा क्रेडीट स्कोर उत्तम असेल परंतु मासिक उत्पन्नच मुळात कमी असेल, तर तुम्हाला कर्ज मिळणे कठीण आहे. मासिक उत्पन्नाबरोबरच तुमच्या उत्पन्नावर नेमके किती लोक अवलंबून आहेत, आणि तुम्हाला उत्पन्नाचे इतर काही स्त्रोत आहेत का, याचासुद्धा विचार कर्ज मंजूर करण्याआधी केला जातो.
वय
कर्ज घेताना अर्जदाराचे वय हा मुद्दा महत्त्वाचा असतो. बहुतेकवेळी ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांना कर्ज देण्यात येत नाही. सेवानिवृत्तीच्या जवळ असलेल्या लोकांना दीर्घ मुदतीची कर्जे मिळत नाहीत.
नोकरी
अधिकाधिक बँक्स आणि वित्तीय संस्थान तुमची नोकरी किती वर्षे झालेली आहे याकडे सुद्धा लक्ष देतात. कमीत कमी २ वर्षे सलग नोकरी झाल्याशिवाय कर्ज मंजूर होणे कठिण असते. एका कंपनीत तुम्ही किती काल स्थिर नोकरी करता हे देखील महत्वाचे आहे. तुम्ही वेळोवेळी नोकऱ्या बदलल्याचे निदर्शनास आल्यास तुमचे करिअर अस्थिर आहे असे मानून तुमच्या एकूण विश्वसनीयतेवरच शंका घेण्यात येते आणि कर्ज मंजूर होणे कठीण होते.
ई एम. आय. आणि वेतन
जर तुमच्या कर्जा च्या मासिक हप्त्याची रक्कम तुमच्या एकूण मासिक उत्पन्ना च्या ५० टक्के असेल तर तुम्हाला कर्ज देणे शक्य नसते. मात्र तुमचे उत्पन्न अधिक आणि ई.एम.आय. छोटा असेल तर नक्कीच कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.