मुंबई – खरेदी करताना क्रेडिट कार्ड वापरल्यास रिवॉर्ड पॉईंटची मोठी संधी असते. अलिकडे त्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. पण पहिल्यांदा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एकाचवेळी सर्व बॅंकांमध्ये क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे टाळायला हवे.
बहुतांश बँकांचे क्रेडिट कार्डसाठी वार्षिक शुल्क असते. तर काही कार्ड आयुष्यभरासाठी विनाशुल्क असतात. जर ग्राहक क्रेडिट कार्डद्वारे जास्तीत जास्त खरेदी करतात तर त्यांचे वार्षिक शुल्क तसेच इतर अनेक शुल्क माफ केले जातात. सर्वसाधारणपणे नियमित खर्चाद्वारे रिवॉर्ड प्राप्त केले तर ते वार्षिक शुल्कापेक्षा जास्त असते. त्यामुळे त्याचा लाभच होतो. मात्र क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढली तर जास्तीचे शुल्क भरावे लागते. त्याचा व्याजदर जास्त असतोच, पण उशीरा बील भरणे, क्रेडिट मर्यादेच्या पलीकडे खर्च करणे, विदेशी चलनात वापरणे आदींवर भुर्दंड भोगावा लागतो.
क्रेडीट मर्यादा
क्रेडिट मर्यादा म्हणजे ग्राहकाला खर्चासाठी ठेवलेली कमाल मर्यादा होय. महिन्यासाठी नेमून देण्यात आलेली ही मर्यादा असते. त्यापेक्षा जास्त खर्च केल्यास शुल्क मोजावे लागते. पण ग्राहकांनी मर्यादेच्या ३० ते ४० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च करायला नको, असे अर्थतज्ज्ञ नेहमी सांगतात. पहिल्यांदा अर्ज करीत असाल तर मोठी रक्कम बँकेत डिपॉझिट केली तर मोठी क्रेडीट मर्यादा मिळू शकते.
रिवॉर्डस्
क्रेडिट कार्ड विविध प्रकारच्या रिवॉर्ड्ससोबत मिळतात. त्यामुळे कार्ड घेण्यापूर्वी ग्राहकांनी एकदा आपल्या लाईफस्टाईलचा पुन्हा एकदा विचार करायला हवा.