नाशिक- कोरोनाचा मृत्यूदर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा तुलनेने कमी असून हे सर्व नाशिककरांच्या सहकार्याने झाले आहे परंतु अजून लस न आल्याने धोका पूर्णपणे नाहीसा झाला नाही त्यामुळेच लस येईपर्यंत मास्क वापरणे,वारंवार साबणाने किंवा सनिटाइजर ने हात धुणे व सामाजिक अंतर पाळणे हाच बचावाचा मार्ग आहे असे प्रतिपादन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते क्रेडाई नाशिक मेट्रो व नरेडको यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्याने कोविड पार्श्वभूमीवर दुर्बल घटकांसाठी मास्क व सॅनिटायझर वितरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी मंचावर नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलाश जाधव क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन,नरेडको चे अध्यक्ष अभय तातेड, क्रेडाईचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, जयेश ठक्कर व सुनील गवादे हे मान्यवर उपस्थित होते
पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की या महामारी मध्ये क्रेडाई ने सामाजिक बांधिलकीतून समाजातील सर्व घटकांसाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यामध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट कोविड सेंटर उभारण्यापासून ते अनेक ठिकाणी आवश्यक ती मदत पोहोचणे पर्यंत आहे. शिधावाटप,ॲप, आवश्यक ती आरोग्य उपकरणे हॉस्पिटल ला देणे यामध्ये प्रमुख आहेत. नागरिक म्हणून आपण देखील पूर्णपणे काळजी घेऊन या रोगाचा प्रसार रोखला पाहिजे अशी अपेक्षाही छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी उपस्थित नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी नाशिक मधील सर्वच संस्थांच्या दातृत्वाची व सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली ते म्हणाले कुठलीही आपत्ती असो अथवा कुंभमेळा सारखा मोठा उत्सव यामध्ये नाशिककरांनी नेहमीच पुढे येऊन आपला हातभार लावला आहे. कोविड आपत्तीतही सर्व नाशिक कर आपली काळजी घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दुर्बल घटकांसाठी मास्क व सॅनिटायझर वितरण या मोहिमेबाबत आपल्या प्रास्ताविकात अधिक माहिती देताना क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की घरकुलाच्या स्वप्नपूर्ती सोबतच क्रेडाईने नेहमीच समाजासाठी कार्य केले आहे. ठक्कर डोम मधील कोविड सेंटर देखील क्रेडाईने उभारले असून नाशिकला मुक्त करण्यासाठी शासनाच्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेत देखील सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. नाशिक हे देखील आपले कुटुंब असल्याचे क्रेडाई मानत असून या कुटुंबातील दुर्बल घटकांना मदत म्हणून ही मोहीम हाती घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी बोलताना नरेडको चे अध्यक्ष अभय तातेड म्हणाले की, या मोहिमेअंतर्गत दुर्बल घटक, अपंग, बेघर यांना 25000 मास्क व एक हजार सॅनिटायझर चे वितरण करण्यात येणार असून या मोहिमेसाठी नाशिक महानगरपालिकेचा सक्रिय सहभाग लाभत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रेडाई नाशिक मेट्रोचे सहसचिव सचिन बागड यांनी तर आभार उपाध्यक्ष कृणाल पाटील यांनी मानले. प्रसंगी महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी, क्रेडाई नाशिक मेट्रो व नरेडको चे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.