नाशिक – जग वाचविण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करावे लागेल, वृक्ष लागवड मोहीम त्यातील एक महत्वाचे पाऊलच नाही तर ती आजची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. क्रेडाई नाशिकच्या वतीने आयोजित केलेल्या कल्पवृक्ष या वृक्षलागवड मोहिमेचा आज त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
भुजबळ म्हणाले की, जग वाचवायच असेल तर वृक्षारोपणाचे काम निरंतर करावं लागणार आहे. त्यासाठी क्रेडाईने सामाजिक बांधिलकीतुन एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. वृक्षारोपण करतांना आपण किती झाड लावली याला महत्व नाही तर किती जगविली याला अधिक महत्व आहे. त्यामुळे जेवढी झाड लावली तेवढ्या झाडांची काळजी घेऊन ती जगविली पाहिजे. यासाठी सामूहिक जबाबदारीतुन हा कार्यक्रम हाती घेऊन झाड वाचविले पाहिजे, कारण आपण जे करू त्याचा फायदा समाजाला होणार आहे. त्यामुळे लावलेल्या झाडांचे चांगलं संगोपन करा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. क्रेडाईच्या माध्यमातून नाशिकमध्ये कल्पवृक्ष योजनेच्या माध्यमातून १५ ते २८ ऑगस्ट पर्यंत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामाध्यमातून १० हजार झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी रवी महाजन यांनी दिली.
यावेळी अनंत राजेगावकर, नेमीचंद पोद्दार, सुरेश पाटील, सुनील कोतवाल, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, अनिल आहेर, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, अंजन भालोडीया, समाधान जेजुरकर हे उपस्थित होते.