नाशिक – बांधकाम व्यवसायिकांची देशातील शिखर संस्था क्रेडाईच्या राष्ट्रीय चेअरमन पदी पुण्याचे सतीश मगर यांची निवड झाली असून क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यांच्यासोबतच क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर यांची राष्ट्रीय क्रेडाई च्या घटना सल्लागार समितीचे प्रमुख म्हणून व गौरव ठक्कर यांची राष्ट्रीय क्रेडाई च्या श्वेत पत्रिका समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. हि निवड वर्ष २०२१ – २०२३ या कालावधीसाठी राहणार आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाईन सोहळ्यात हि घोषणा करण्यात आली.
क्रेडाई नाशिक मेट्रो व क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी क्रेडाई संस्थेसाठी भरीव कार्य केले असून संघटना वाढीसाठी राज्यभरात क्रेडाईचे अनेक चॅप्टर सुरु केले आहेत. बांधकाम क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे.
अडीच कोटी बांधकाम कर्माचा-यांसाठी लसीकरण
कोविडच्या वैश्विक संकटात क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविले गेले. याचाच पुढील भाग म्हणून देशातील क्रेडाई सदस्यांच्या साईटवरील अडीच कोटी बांधकाम कर्मचा-यांसाठी विनामूल्य कोविड लसीकरण मोहीम क्रेडाई तर्फे राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येणार आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली.