मुंबई – येथील क्रिकेटीयर्स फाउंडेशन संस्थेतर्फे ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांअंतर्गत पाच निवृत्त स्कोअरर्सला आर्थिक मदत देण्यात आली. कोरोनाकाळात उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या मदतीचा हात म्हणून निधी देण्यात आला. निवृत्त स्कोअरर्सला प्रत्येकी पंधरा हजार रुपयांची मदत यावेळी करण्यात आली. यात सर्वश्री रमेश परब, उदय घरत, गंगाराम सपकाळ, अनंत कुपेरकर व अरविंद पाटील यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे क्रिकेटीयर्स फाऊंडेशनच्या वतीने सुधीर वैद्य यांना क्रिकेट स्टॅटिस्टिशियन (आकडेतज्ञ) योगदानाबद्दल पंचाहत्तर हजार रुपये देऊन गौरवण्यात आले. लाभधारकांचे खातेवार तपशील संस्थेने मागवला होता. कोणताही कार्यक्रम न करता अत्यंत साध्या पद्धतीने रक्कम लाभधारकांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे संस्थेच्या संचालकांनी सांगितले. याआधी संस्थेच्या वतीने निवृत्त पंचांना आर्थिक मदत देण्यात आली होती. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन संस्था काम करते आहे. क्रीडा क्षेत्रातील निवृत्त खेळाडू व पंचांच्या मदतीसाठी क्रिकेटीयर्स फाउंडेशन वेळोवेळी पुढाकार घेत असते.