विश्वासघाताने दुचाकी पळविली
नाशिक : मोबाईल व काही वेळा पुरती दिलेली मोटारसायकल एकाने परस्पर पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाण्या उर्फ रवी बागुल (१९ रा.शनिमंदिरामागे,नवनाथनगर) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी भारत अंबादास जाधव (२० रा.कोळवाडी,हिरावाडीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयीताने २५ सप्टेंबर बागुल यास गाठून मोबाईल आणि दुचाकीचा परस्पर अपहार केला. बागुल निलगीरी बाग येथील डाळींब बाग येथे उभा असतांना संशयीताने त्यास गाठले. यावेळी मोबाईलसह अल्पवेळ दुचाकीची पाहिजे असे म्हणून तो मोबाईल आणि दुचाकी (एमएच १५ जीएम ६७२१) घेवून गेला तो अद्याप परतला नाही. मोबाईल सह दुचाकीचा संशयीताने विश्वासघात करून अपहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.
…..
अशोका मार्गावर महिलेचे मंगळसुत्र खेचले
नाशिक : पतीसमवेत भाजीपाला खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना अशोका गेस्ट हाऊस परिसरात घडली. याप्रकरणी मुंंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल रविंद्र फुले (रा.शशिनील अपा.अशोका गेस्ट हाऊस समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंगल फुले रविवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास पतीसमवेत परिसरात भाजीपाला खरेदीसाठी जात असतांना ही घटना घडली. अशोका मार्ग टी पॉईट येथील पायोनियर सर्कल समोरून फुले दांम्पत्य पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांने त्यांच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
……
ज्वेलरी शॉपमधून दागिणे चोरी
नाशिक : खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या भामट्या महिलांनी दागिणे चोरून नेल्याची घटना भाभानगर परिसरात घडली. याप्रकरणी चार अनोळखी महिलांविरूध्द मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चोरट्या महिलांचा शोध घेत आहेत. शेख फिरोज रहूलामिन (रा.हरी पॅलेस,कौटघाट रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख यांचे भाभा नगर परिसरात ज्वेलरी शॉप आहे. गेल्या बुधवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास चार अनोळखी महिला दुकानात आल्या होत्या. दागिणे बघण्याचा बहाणा करून शॉप मधील कामगारांचे लक्ष विचलीत करून भामट्यांनी महिलांनी सोन्याची कानातील बाळी आणि मोठे टॉप्सचा जोड असा सुमारे ४८ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
……
कापड दुकान मालकास मारहाण
नाशिक : उधारीचे पैसे मागितल्याने संतप्त टोळक्याने दुकान मालकास लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. यावेळी मालकाच्या भावाने मदतीसाठी धाव घेतली असता संशयीतांनी शिवीगाळ करीत दुकान बंद करण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश पवार (रा.कारगिल चौक,दत्तनगर) व त्याचे दोन अनोळखी साथीदार अशी संशयीतांची नाव आहेत. याप्रकरणी हृदयराम तुळशीराम कुंभार (रा.कारगिलचौक,दत्तनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. कुंभार यांचे कारगिल चौकात महारूद्र पतसंस्थेच्या शेजारी नेस्ट जनरेशन नावाचे कापड दुकान आहे. संशयीताने आठ महिन्यांपूर्वी दुकानातून उधारीत कपडे खरेदी केले होते. शनिवारी (दि.१७) संशयीताने पुन्हा दुकान गाठून काही रक्कम लावून उधारीत कपडे खरेदी केले. सदरचे कपड्यांमधील काही कपडे तो दुकानात परत करण्यासाठी आला असता ही घटना घडली. यावेळी कुंभार यांनी त्याच्याकडे मागील उधारीच्या पैश्यांची मागणी केली असता संशयीताने लाकडी दांडका कुंभार यांच्या डोक्यात मारून जखमी केले. यावेळी कुंभार यांचे बंधू आपल्या भावाच्या मदतीस धावून आले असता त्यांनाही संशयीत टोळक्याने शिवीगाळ करीत तुम्हाला येथे धंदा करू देणार नाही असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.
……
पल्सरच्या धडकेत एक ठार
नाशिक : भरधाव पल्सर दुचाकीने एकास धडक दिल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला. सदर इसम रस्ता ओलांडत होता. हा अपघात त्र्यंबकरोडवरील भोळेनाथ हॉटेल समोर झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण भिमराव काकडे (रा.ईएसआय हॉस्पिटल वसाहत,सातपूर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काकडे रविवारी (दि.१८) त्र्यंबकरोडने आपल्या घराकडे पायी जात असतांना हा अपघात झाला. भोळेनाथ हॉस्पिटल समोर ते रस्ता ओलांडत असतांना भरधाव आलेल्या एमएच १५ जीयू ५५३२ या दुचाकीने त्यांना धडक दिली. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. यात काकडे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी गणेश म्हात्रे (रा.अशोकनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील दुचाकीस्वाराविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.
…..
पिंपळगावला महिलेची आत्महत्या
नाशिक : विषारी औषध सेवन करून ४० वर्षीय महिलेने आत्महत्या केली. ही घटना सातपूर नजीकच्या पिंपळगाव बहुला येथे घडली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सरला संतोष वाघ (रा.पिंपळगाव बहुला) असे मृत महिलेचे नाव आहे. सरला वाघ यांनी रविवारी (दि.१८) सायंकाळी आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता रात्री त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक सिध्दपूरे करीत आहेत.
…..
कारमध्ये शॉर्टसर्क्रि ट एकाचा होरपळून मृत्यु
नाशिक : भरधाव कारमध्ये गॅस गळती होवून शॉर्ट सर्क्रिट झाल्याने २५ वर्षीय चालकाचा होरपळून मृत्यु झाला. ही घटना त्र्यंबकरोडवरील महिरावणी परिसरात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुनिल देविदास चव्हाण (रा.रेणूका माता चौक,श्रमिकनगर) असे मृत कारचालकाचे नाव आहे. सुनिल चव्हाण रविवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास महिरावणी येथून श्रमिकनगरच्या दिशेने आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. अचानक भरधाव कारमध्ये गॅस गळती होवून शॉर्ट सर्क्रिट झाला. या घटनेत चव्हाण भाजला गेला होता. मित्र भुषण माळी यांनी त्यास तात्काळ नजीकच्या सार्थक हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक सिध्दपुरे करीत आहेत.
….
दुचाकी घसरल्याने तरूणाचा मृत्यु
नाशिक : भरधाव दुचाकी घसरल्याने तरूणाचा मृत्यु झाला. हा अपघात दिंडोरीरोडवरील तारवालानगर भागात झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
अक्षय आबासाहेब पवार (२४ रा.गंगात्री कॉलनी,बिडी कामगारनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अक्षय पवार रविवारी (दि.१८) दिंडोरी रोडने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. म्हसरूळ कडून पंचवटीच्या दिशेने जात असतांना तारवालानगर येथील साईपुजा सोसायटी समोर भरधाव वेगातील दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. कुटूंबियांनी त्यास तात्काळ अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार पिंगळे करीत आहेत.
….
सर्पदंशाने शेतक-याचा मृत्यु
नाशिक : शेतात काम करीत असतांना विषारी सापाने चावा घेतल्याने ५४ वर्षीय शेतक-याचा मृत्यु झाला. ही घटना मखमलाबाद शिवारात घडली होती. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर एकनाथ ताडगे (५४ रा.मातोरीरोड,मखमलाबादगाव) असे मृत शेतक-याचे नाव आहे. गेल्या बुधवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास ताडगे आपल्या शेतात काम करीत असतांना ही घटना घडली होती. कामकरीत असतांना त्यांच्या उजव्या पायास विषारी सापाने चावा घेतला होता. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याच्यावर सातपूर येथील साईनाथ हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट येथे दाखल केले असता रविवारी (दि.१८) उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक गावीत करीत आहेत.
…