लॉकडाऊन शिथील होताच गुन्हेगार पुन्हा सक्रिय
नाशिक : लॉकडाऊन शिथील होताच गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले आहे. पेठरोड भागात पिस्तूल आणि धारदार कोयते घेवून घरात शिरलेल्या सराईतांच्या टोळीने महिलांना बेदम मारहाण केली. या घटनेत टोळक्याने कपाटातून सहा हजाराची रोकड काढून पोबारा केला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दरोड्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत अशोक जाधव (२७, श्रीधर कॉलनी, म्हसरूळ), योगेश प्रल्हाद लांबाडे (२४, जकात नाका, म्हसरूळ), रोहन प्रभाकर निकम (२८, टाकळीरोड, जयभवानीनगर), अंकुश भुषण सोनवणे (२५, बोधलेनगर), मयुर विवेकांनद वाघमारे (२३, दत्तमंदिर कॉलनी, उपनगर), जतीन दिलीप साळुंके (१८, रा.साईक्षेत्र अपा,पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सोनी जाधव (रा. पेठरोड, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार पीडितेच्या भावाचे संशयीत परिचीत असून, ते सर्व गुन्हेगार आहेत. सोमवारी (दि.२६) सकाळी घरात असतांना संशयीत टोळीने घरात प्रवेश केला. यावेळी प्रशांत जाधव याच्या कमरेस पिस्तूल लावलेला होता. तर अन्य संशयीतांकडे धारदार कोयते होते. या टोळीने घरात घुसताच पीडितेची आई,भावजयी आणि मुलीस शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी अंकुश सोनवणे याने पीडितेवर कोयत्याने हल्ला करीत संसारोपयोगी वस्तूचे नुकसान केले. तर प्रशांत जाधव याने कपाटात ठेवलेली घरखर्चाची सहा हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. यावेळी टोळक्याचा आवाज ऐकुण मदतीस धावून आलेल्या पीडितेच्या मावशीस संशयीतांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. भेदरलेल्या कुटूंबियासमोर दहशत माजवित दुचाकीस्वार टोळके पसार झाले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
……
महिलेचा विनयभंग
नाशिक: मोबाईलवर व्हिडीओ कॉल करून एकाने महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ ते २२ आॅक्टोबर दरम्यान अज्ञात व्यक्तीने पिडीतेच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल केला. या कॅालवरुन अश्लिल हाव भाव करून नग्न अवस्थेत महिलेशी संवाद साधला. त्याचप्रमाणे अश्लिल फोटो टाकले. याबाबत महिलेने तक्रार केली.या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित विरोधात विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
….
खूटवडनगरला कापड दुकान फोडले
नाशिक: बंद दुकानाचे कुलूप तोडून चोरटयांनी गल्यातील रोकड आणि कपडे असा सुमारे २६ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना खुटवडनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता किशोर भालेराव (रा. कोकण भवनजवळ, सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भालेराव यांचे कार्तीकेय नगर भागात श्रीलक्ष्मी कलेक्शन नावाचे कापड दुकान आहे. रविवारी (दि.२५) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ही घरफोडी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी गल्यातील साडे चार हजाराची रोकड तसेच कपडे असा सुमारे २६ हजार २३० रूपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात महिलांच्या विविध प्रकारच्या कपड्यांचा समावेश आहे. अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
……
मनपा क्रीडा संकुलात चोरी
नाशिक : महापालिकेच्या क्रीडा संकुलातील इलेक्ट्रीक साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना नारायण बापु नगर भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय ईश्वरदास कुलकर्णी (रा. इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आढावनगर येथील मनपाच्या क्रीडा संकुलातून सोमवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रीक पंखे आणि ट्यूब लाईट असा सुमारे १३ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या घटनेने क्रीडा संकुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
…..
तडीपार गुंड जेरबंद
नाशिक: दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केलेले असतांनाही शहरात वावर ठेवणा-या सराईतास म्हसरूळ पोलीसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज पन्नालाल सोनवणे (३०, रा. आळंदी कॉलनी, बोरगड) असे अटक करण्यात आलेल्या सराईत संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनवणे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात वेगवेगळया पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. समज देवूनही त्याचा उपद्रव वाढल्याने परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी त्यास गेल्या ३० जुलै रोजी शहर आणि जिल्हयातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच होता. परवानगी न घेता तो रविवारी (दि.२५) रात्री दिंडोरीरोड येथील गोकूळ वाईन्स भागात येणार असल्याची माहिती मिळाल्याने म्हसरूळ पोलीसांनी सापळा लावून त्यास जेरबंद केले. अधिक तपास पोलीस नाईक हुल्लुळे करीत आहेत.
…..
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
नाशिक : राहत्या घरात पंख्याला गळफास लावून घेत ३७ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दिपक सुरेश देवरे (३७, रा. बनात चाळ, देवळाली कॅम्प) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास देवरे यांनी आपल्या घरात कुणी नसतांना अज्ञात कारणातून पंख्याला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास जमादार हांडोरे करीत आहेत.
….
कोयताधारी त्रिकुट पोलीसांच्या जाळयात
नाशिक : शहरात धारदारशस्त्र बाळगणा-याविरोधात पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला असून,औद्योगीक वसाहतीत दुचाकीस्वार त्रिकुट पोलीसांच्या जाळयात अडकले आहे. संशयीतांकडे धारदार कोयता मिळून आला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल रामदास तुरकने ( रा.हिंगोली ता.वैजापूर,औरंगाबाद),करण दादाराव मोहिते (रा.कनकुरी ता.राहता जि.अ.नगर) व आकाश शंकर गांगुर्डे (रा.ओझर ता.निफाड) अशी दुचाकीस्वार शस्त्रधारींची नावे आहेत. कोम्बींगमध्ये आढळून आलेल्या शस्त्रसाठ्याच्या पार्श्वभूमिवर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी संशयास्पद वाहन तपासणीचे आदेश जारी केले आहे. त्यानुसार शहरात मोठ्याप्रमाणात वाहन तपासणी सुरू झाली आहे. सोमवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास संशयीत एमएच १७ सीएफ ७६३१ या दुचाकीवर प्रवास करीत मिळून आले. औद्योगीक वसाहतीतील कार्बन नाक्याकडून एबीबी कंपनीच्या दिशेने ट्रीपलसीट भरधाव जात असतांना पोलीसांनी त्यांना अडविले. राहणीमाणावरून संशय आल्याने पोलीसांनी त्यांची अंगझडती घेतली असता डिक्कीत धारदार लोखंडी कोयता मिळून आला. याप्रकरणी पोलीस शिपाई आनंता महाले यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार राठोड करीत आहेत.