सोन्याची पोत हिसकावली
नाशिक: रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेची सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना पंचवटीतील रामवाडी परिसरात गुरूवारी (दि.२९) सकाळी घडली. याप्रकरणी सुष्मा सुनील वर्हाडे (६५, रा. क्रांतीनगर, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वर्हाडे या सकाळी व्यायाम करत चालत जात असताना रामवाडी येथील सुलभ शौचालयासमोर काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पळ काढला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक एस.बी. चोपडे करत आहेत.
…..
नानावलीत एकावर चाकू हल्ला
नाशिक: शिवीगाळ का करता अशी विचारणा केल्यावरून चौघांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण करत चाकूने हल्ला केल्याची घटना भद्रकालीतील नानावली परिसरात बुधवारी (दि.२८)रात्री घडली. अमोल डांगरे, विशाल डांगरे, त्यांचे वडील तसेच लखन काशीद (रा. सर्व कोळीवाडा, नानावली) अशी चाकू हल्ला करणार्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सुरज अंबादास पोटिंदे (रा. शिवाजी चौकी, कथडा) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोटिंदे हे मेडिकलमध्ये जात असतांना शिवाजी चौकात उभे असलेल्या डांगरे यांना मला शिवीगाळ का करता असे विचारले, याचा राग आल्याने डांगरे यांनी त्यास शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच काशीद याने हातातील चाकूने पोटींदेच्या छातीवर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक लभडे करत आहेत.
…..
बनावट नोटरी प्रकरणी दोघांवर गुन्हा
नाशिक: न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजुर होण्यासाठी बनावट नोटराईज प्रामिसरी नोट तयार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कमलेश महादेव ओझे (रा. गुलश पार्क, वडाळा रोड) व रफिक इमोजद्दीन शेख (४४, रा. काडेविल चाळ, अंबरनाथ, ठाणे) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. हे दोघे एएस ऍग्री ऍण्ड अक्वा कंपनीचे संचालक आहेत. फसवणुक प्रकरणी अटक टाळण्यासाठी त्यांनी बनावट नोटराईज प्रामिसरी नोट तयार करून न्यायालयात सादर केली. यामुळे त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
……
तीन लॅपटॉप लंपास
नाशिक: रूमचा दरवाजा उघडा राहिल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने विद्यार्थ्यांचे तीन लॅपटॉप चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.३०) दिंडोरी रोडवरील कलानगर परिसरात घडला. याप्रकरणी दिपक उत्तम बागुल (२५, रा. कलानगर, दिंडोरीरोड, म्हसरूळ) याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार येथील गिताई निवास येथे काही विद्यार्थी एका रूममध्ये राहत आहेत. सकाळी ६ वाजेच्या सुमारास रूमचा दरवाजा उघडा राहिल्याची संधी साधत चोरट्यांनी बागुल यासह सिद्धार्थ इनके तसेच अंकुश दास यांचे लॅपटॉप लंपास केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…….
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नाशिक: अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून तीचा विनयभंग केल्याचा तसेच संशयिताच समजवण्याचा प्रयत्न करणार्या पीडितेच्या आई वडीलांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओमकार दादासाहेब लोंढे (१९) व सागर कदम (१९, पुर्ण नाव पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोंढे व कदम हे त्यांच्या अल्पवयीन मुलीचा १ मे २०२० ते आतापर्यंत वेळोवेळी पाठलाग करून विनयभंग करत होते. तक्रार दार त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले असता दोघांनी पीडितेच्या आई वडीलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांवर बालकांच्या लैंगित अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास सहायक निरिक्षक मन्सुरी करीत आहेत.
….
हप्ता न दिल्याने खूनी हल्ला
नाशिक: दुकान चालू ठेवण्यासाठी गुंडास हप्ता न दिल्याच्या कारणातून चिडून त्याने दुकानदारावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला केल्याचा प्रकार गुरूवारी (दि.२९) रात्री नाशिकरोडला मुक्तीधाम परिसरात घडला. सत्तु भैरू राजपुत (पुर्ण नाव पत्ता नाही) असे सशिंयताचे नाव आहे. याप्रकरणी मंगेश किसन कदम (रा. गुलमोहर कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कदम हे मुक्तीधाम परिसरात पावाभाजीचे दुकान चालवतात दुकान चालू ठेवण्यासाठी येथील सराईत गुंड सत्तु भैरू राजपुत हा दरमहा हप्ता घेतो. गुरूवारी त्याने कदम यांच्याकडे हप्त्याची मागणी केली. त्यांनी त्यास नकार देताच त्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार विंचु करत आहेत.