दुचाकीस्वार महिलेची पोत खेचली
नाशिक : दुचाकीवर प्रवास करणा-या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत भामट्या मोटारसायकलस्वारांनी ओरबाडून नेल्याची घटना मायको सर्कल भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती सिताराम जाधव (रा.कमलनगर,कामटवाडा) यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव या बुधवारी (दि.७) कामानिमित्त शहरात आल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या आपल्या घरी परतत असतांना ही घटना घडली. त्र्यंबकरोडने एमएच २१ बी ८९९९ या दुचाकीवर त्या प्रवास करीत असतांना काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे २० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. ही घटना मायको सर्कल परिसरातील सिडको मार्गावर घडली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.
….
कारच्या धडकेत एक ठार
नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत त्र्यंबकेश्वर येथे आपल्या सासरवाडीस जाणा-या डोंबिवली येथील तरूणाचा मृत्यु झाला. रस्ता ओलांडत असतांना कारने मृतास धडक दिली होती. हा अपघात त्र्यंबकरोडवरील चंद्रभागा लॉन्स परिसरात झाला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात कारचालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निशांत भीमराव पाटील (३२ रा.डोंबिवली) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रल्हाद पांडे (रा.कसारा ता.शहापूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. मृत पाटील मंगळवारी नातेवाईकांना सोबत घेवून त्र्यंबकेश्वर येथे आपल्या सासरवाडीस जात असतांना ही घटना घडली. प्रवासादरम्यान त्र्यंबकरोडवरील यश पेट्रोल पंपावर त्यांची पिकअप वाहन थांबले असता पाटील प्रांतविधीसाठी वाहना खाली उतरले होते. चंद्रभागा लॉन्स समोर रस्ता ओलांडत असतांना त्र्यंबककडून भरधाव येणाºया एमएच १५ ईपी ७९१० या कारने त्यांना जोरदार धडक दिली. कारचालकासह नातलगांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. दरम्यान कार चालकाने मृतास रूग्णालयात दाखल करून पोबारा केला असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.
….
दुचाकी झाडावर आदळल्याने एक ठार
नाशिक : भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने ३० वर्षीय तरूण ठार झाला. हा अपघात तपोवन रोडवर झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. स्वप्निल रामकृष्ण चौधरी (रा.शिवेज अपा.सेतूभवन जवळ अंबड लिंक रोड) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. चौधरी मंगळवारी (दि.६) सायंकाळी आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पोतदार स्कुल समोर भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने चौधरी गंभीर जखमी झाले होते. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. चौधरी यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार परदेशी करीत आहेत.
…..
कारागृहात कैद्याची आत्महत्या
नाशिक : शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने मास्कच्या नाडीचा वापर करीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात घडली. कैद्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अजगर अली मोहम्मद मुमताज मन्सुरी (३२) असे आत्महत्या करणा-या कैद्याचे नाव आहे. गेल्या काही वर्षा पासून अजगर मन्सुरी कारागृहात शिक्षा भोगत होता. बुधवारी (दि.७) सकाळच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अज्ञात कारणातून त्याने आपल्या बराक मध्ये मास्कच्या नाडीचा वापर करून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कारागृह रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिका-ायांनी तपासणी केली असता त्यास मृत घोषीत करण्यात आले. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.