घरात शिरुन मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल
नाशिक – कौटुंबिक वादातून चौघा संशयितांनी घरात शिरुन एका कुटूंबियास मारहाण केल्याची घटना अशोकामार्ग येथील जयहिंद नगर परिसरात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात शबाना अदनाम इफेंडी, नईम युनुस शेख, फरीन नईम शेख, इरफान सैयद (सर्व रा. मुंबई) यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी शनिवारी (दि.३) दुपारच्या सुमारास सुहैब फरमानअली लोगडे यांच्या घरात शिरुन त्यांच्या आई व बहिणीला मारहाण करीत घरातील साहित्याची तोडफोड केली. तसेच धमकी दिली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस तपास करीत आहेत.
…..
चोरट्याने १५ हजार रुपयांची दुचाकी केली लंपास
नाशिक – पंचवटीतील मनिषा आश्रमाजवळून चोरट्याने १५ हजार रुपयांची दुचाकी लंपास केल्याची घटना २६ सप्टेंबरला घडली. याप्रकरणी गणेश चांगदेव सोनवणे (रा. मखमलाबाद रोड) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
…….
किरकोळ कारणावरुन कुरापत काढून मारहाण
नाशिक – चुंचाळे येथील घरकुल योजना येथे किरकोळ कारणावरुन कुरापत काढून एकास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी ज्ञानेश्वर उत्तम पवार (३१, रा. अंबड) यांनी अंबड पोलीस ठाण्यात संशयित राजू मोतीराम अत्राम (३६, रा. चुंचाळे) याच्याविरोधात मारहाणीची फिर्याद दाखल केली. संशयित राजूने शुक्रवारी (दि.२) सायंकाळी कुरापत काढून ज्ञानेश्वर यांना मारहाण केली व दमदाटी केली. याप्रकरणी अंबड पोलीस तपास करीत आहेत. द्वारका येथील आयप्पा मंदिराजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. अंदाजे ५० ते ६० वर्षीय असलेल्या या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.