कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार
नाशिक : भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ४० वर्षीय महिला ठार झाली. या अपघातात मृत महिलेच्या पतीसह १२ वर्षीय पुतण्या जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात महामार्गावरील के.के.वाघ महाविद्यालयासमोर झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परप्रांतीय कंटेनर चालका विरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पना सुरेश महाले (४४ रा.चेतनानगर,नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात महिलेचे पती सुरेश धनाजी महाले (५०) व पुतण्या वैभव गिरीधर महाले (१२) जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. महाले दांम्पत्य मंगळवारी (दि.३) मालेगाव तालूक्यातील मथुरपाडा या आपल्या मुळ गावी गेले होते. रात्रीच्या सुमारास ते दुचाकीने घरी परतत असतांना हा अपघात झाला. महामार्गाने महाले दांम्पत्य एमएच १५ जीएन ५९५७ या दुचाकीवर ट्रिपलसिट प्रवास करीत असतांना के.के.वाघ महाविद्यालयासमोर पाठीमागून भरधाव येणा-या कंटेनरने (एमएच १५ एफव्ही ६७७६) दुचाकीस धडक दिली. या अपघातात कल्पना महाले या जागीच ठार झाल्या तर पती सुरेश महाले आणि पुतण्या वैभव महाले गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने नजीकच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी कंटेनर चालक चंद्रकुमार दुधनाथ राम (रा.चौबेपुर,वाराणसी उत्तरप्रदेश) याच्याविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.
….
मुंबईच्या महिलेची पोत खेचली
नाशिक : बहिणी समवेत घराकडे जाणा-या मुंबईच्या महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना सिडकोतील शिवाजी चौक भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजश्री सखाराम राजभोग (रा.प्रतिक्षानगर,सायन मुंबई) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राजश्री राजभोग या सोमवारी (दि.२) नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी त्या बहिण वैशाली कानडे व मामी लता मोरे यांच्या समवेत घराकडे परतत असतांना ही घटना घडली. लाईफ केअर हॉस्पिटलकडून त्या शिवाजी चौकाकडे तीन्ही महिला पायी जात असतांना डॉ. खोडे यांच्या क्लिनीक परिसरात समोरून विरूध्द दिशेने आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बेडवाल करीत आहेत.
…..
अमृतधाम परिसरात चोरट्यांनी दोन घरे फोडली
नाशिक : दोन बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोकडसह संसारोपयोगी वस्तू चोरून नेल्या. ही घटना अमृतधाम परिसरातील गोपालनगर भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश तापीराम बडगुजर (रा.गोपालनगर,अमृतधाम) यांनी तक्रार दाखल केली आहे. बडगुजर आणि शेजारी राहणारे जितेंद्र दयाभाई पटेल यांचे कुटूंबिय सोमवारी (दि.२) वेगवेगळया गावी गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी हा डल्ला मारला. दोन्ही बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील आठ हजाराची रोकड सिलेंडर आणि संसारोपयोगी वस्तू असा सुमारे ११ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार ठाकरे करीत आहेत.
…..
तीन दुचाकी चोरी
नाशिक : शहर परिसरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातून नुकत्याच तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी गंगापूर,इंदिरानगर आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
महेश नागमुनेश्वरराव नक्का (रा.अर्चित क्लासिक अपा. विजय कॉलनी,संभाजी चौक ) यांची पल्सर एमएच १५ एचई ४६४४ गेल्या शनिवारी (दि.३१) त्याच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यानी चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक चौधरी करीत आहेत. दुसरी घटना प्रसन्न कॉलनीत घडली. चेतन गजानन जाधव (रा.बागमती अपा.सुर्या हॉटेल मागे,प्रसन्न कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जाधव यांची अॅक्टीव्हा एमएच १५ जीयू ६५४७ रविवारी (दि.१) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत. तर सिडकोतील नवनीतभाई काजीभाई परसानिया (रा.प्रितीश अपा.देवदत्तनगर,बुरकुले हॉल मागे) यांची स्प्लेंडर (एमएच १५ बीयू ७६९४) १२ जून ते २० आॅक्टोंबर दरम्यान त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक महाजन करीत आहेत.
…..
गोरेवाडीत दीड लाखाची घरफोडी
नाशिक : गोरेवाडीतील शास्त्रीनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिता अशोक धिवर (४० रा.तथागत भवन,गोरेवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धिवर कुटूंबिय १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाच्या कडीकोयंडाचे स्क्रु खोलून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यात ठेवलेली २६ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ५१ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.
…….
स्कुटर घसरल्याने एक ठार
नाशिक : कुत्रे आडवे गेल्याने भरधाव स्कुटर घसरून एकाचा मृत्यु झाला. हा अपघात स्टेट बँक कॉलनी भागात झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. बाळासाहेब काशिनाथ बारगजे (५७ रा.न्यु हरिओम अपा.परबनगर) असे मृत स्कुटरचालकाचे नाव आहे. बारगजे सोमवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास वडाळा पाथर्डी रोडने आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. स्कुटरवर ते स्टेट बँक कॉलनी परिसरातील गजानन महाराज मंदिरासमोरून प्रवास करीत असतांना अचानक कुत्रे आडवे गेले. या घटनेत भरधाव स्कुटर घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
….
कागदपत्राचा गैरवापर करून परप्रांतीयाची फसवणुक
नाशिक : कर्ज प्रकरणासाठी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे परस्पर कर्ज काढून टोळक्याने मोबाईल खरेदी करून तो विक्री केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी पाच जणांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इजाज सय्यद,सुयश देवरे,शुभम कातकाडे,अक्षय बागले व महेश गवळी अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी सुधीर डोमन सिंग (रा.संजीव नगर,खालचे चुंचाळे) यांनी तक्रार दाखल केली आहे. परप्रांतीय सुधीर सिंग संजीवनगर भागात वास्तव्यास आहेत. आर्थिक अडचण असल्याने त्यांनी २५ आॅक्टोबर रोजी संबधीताकडे कर्ज प्रकरणासाठी कागदपत्र दिले होते. मात्र संशयीतांनी या कागदपत्राचा गैरवापर केला. कागदपत्राच्या आधारे परस्पर ५० हजाराचे कर्ज काढून मोबाईल खरेदी केला. हा मोबाईल अन्य एकास विक्री करून सदरची रक्कमेचा संशयीतांनी अपहार केली. ही बाब लक्षात येताच सिंग यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
……
हनुमानवाडीत एकाची आत्महत्या
नाशिक : हनुमानवाडीतील जगझाप मळ्यात राहणा-या ५५ वर्षीय इसमाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. रतन लक्ष्मण जगझाप (रा.जगझाप मळा,म.बाद रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रतन जगझाप यांनी मंगळवारी (दि.३) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ नजीकच्या संजीवणी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक पांडे करीत आहेत.