नाशिक : शहरात चेन स्नॅचिंगच्या संख्येत वाढ झाली असून, महिलांप्रमाणेच पुरूषांच्याही गळ्यातील सोनसाखळ्या चोरटे लांबवू लागले आहेत. खुटवडनगर भागात रस्त्याने पायी जाणा-या ५० वर्षीय इसमाच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय नरोत्तम पाटील (५० रा.कार्तिकेयनगर, खुटवडनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.१२) रात्री पाटील जेवण आटोपून परिसरातून फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. माऊली लॉन्स ते आयटीआय ब्रीज या मार्गावरून ते पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यावर थाप मारून सुमारे ६० हजार रूपये किमतीची सोनसाखळी लांबविली. अधिक तपास उपनिरिक्षक शेवाळे करीत आहेत.
………
टोळक्याची दहशत तोडफोड, मारहाण
नाशिक : जेलरोडला फर्नांडिसवाडी परिरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. एका टोळक्याने कोयते, तलवारी, हॉकी स्टीक, स्टंम्प घेऊन घरात घुसून तोडफोड केली तर दुस-या घटनेत टोळक्याने घरात घुसून एकास बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याच्या धमकी दिली. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गौरव बबन गंडाळे (१९, रा. फर्नांडिसवाडी, जयभवानीरोड) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,संशयित राहुल उज्जेनवाल, संजय उज्जेनवाल, गालु उज्जेनवाल, अजय उज्जनेवाल व भय्या उज्जेनवाल आदींनी सोमवारी (दि.१२) कोयता,लोखंडी दांडके,स्टंम्प,हॉकी स्टिक आदी हत्याराने मारहाण केली. तू भाई बनला आहे का असे म्हणत शिवीगाळ करीत संशयीतांनी हल्ला चढविला. या घटनेत गौरव गंडाळे जखमी झाला असून,संशयीतांनी भाईगिरी केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे. दुसरी तक्रार जस्लीन उज्जेनवाल यांनी दिली आहे. रोहित ढिंगम उर्फ माले,अक्षय पारचे,सागर पारचे,वल्लभ चिडीयाले (रा.सर्व फर्नांडिसवाडी) आदींनी सांयकाळच्या सुमारास भय्यू व प्रतिक हे उज्जेनवाल यांच्या घरात लपल्याच्या संशयातून चॉपर,कोयता व लोखंडी रॉड घेवून घरात प्रवेश केला. यावेळी भय्यू आणि प्रतिक न मिळाल्याने संतप्त टोळक्याने घरातील भांडी व फर्निचरची तोडफोड करून नुकसान केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक परदेशी आणि हवालदार विंचू करीत आहेत.
……..
प्रवासी महिलांनी दागिणे लांबवले
नाशिक : रिक्षातून प्रवासात सहप्रवाशी असलेल्या दोन महिलांनी वृध्दाच्या बॅगेतील दागिणे हातोहात लांबविल्याची घटना नाशिकरोड ते जेलरोड मार्गावर घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिकन पुंडलीक कुमावत (६२, रा. पिंपळपट्टी, जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.१२) कुमावत हे नाशिकरोडच्या आंबेडकर पुतळ्यापासून जेलरोडला जाण्यासाठी रिक्षात बसले असता ही घटना घडली. रिक्षात बसलेल्या दोन भामट्या महिलांनी ही चोरी केली. कुमावत यांची नजर चुकवून अनोळखी प्रवासी महिलांनी त्यांच्या बॅगेतील १ लाख ६४ हजार रूपये किमतीचे दागिण्यांची पिशवी हातोहात लांबविली. ही घटना कुमावत घरी पोहचल्यानंतर उघडकीस आली. अधिक तपास हवालदार भालेराव करीत आहेत.
…..
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नाशिक : वेळोवेळी पाठलाग करून एकाने अल्पवयीन मुलीस एकटे गाठून तिचा विनयभंग केल्याची घटना सावतामाळी नगर भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार अधिनियम (पोस्को) व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाी आहे. मयुर कवडे (रा. शिंदेचाळ, सावतामाळीनगर,नवीन आडगावनाका) असे संशयीताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित कवडे हा तीचा सातत्याने पाठलाग करत होता. ७ आक्टोबरला पीडिता घराशेजारील जलशुध्दीकरण केंद्र येथे असतांना संशयीतांने तिला गाठून एकटी असल्याची संधी साधत प्रेमाची मागणी केली. यावेळी मुलीने नकार देताच संशयीताने तिचा विनयभंग केला. यापूर्वी संशयीताने मुलीच्या वडिलांशी फोनवर संपर्क साधून धमकी दिली होती. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
……
सिडकोत दारूचे दुकान फोडले
नाशिक : सिडकोतील वर्दळीच्या ठिकाणी असलेले दारू दुकान फोडून चोरट्यांनी गल्यातील रोकडसह मद्य असा लाखाचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरूषोत्तम चौधरी (रा. म्हाडा कॉलनी, चुंचाळे शिवार) यांनी तक्रार दाखल केली आहे. सिडकोतील वर्दळीचे ठिकाण असलेल्या त्रिमुर्ती चौकात ही घटना घडली. चौधरी विशाल वाईन्स या मद्यविक्री दुकानाचे काम बघतात. रविवारी (दि.११) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दारू दुकानाचे शटर लोखंडी पहारीच्या सहाय्याने उचकटून प्रवेश केला. गल्यातील रोकड व मद्याची बाटली असा सुमारे ९६ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहायक निरिक्षक गणेश शिंदे करीत आहेत.
….
चाकू हल्यात बापलेक जखमी
नाशिक : किरकोळ कारणातून मावस भावाने केलेल्या चाकू हल्यात बापलेक जखमी झाले. ही घटना मखमलाबाद येथील सिध्दार्थ नगर भागात घडली.याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र एकनाथ खरे असे चाकू हल्ला करणाºया संशयीताचे नाव असून या घटनेतआकाश बर्वे आणि भगवान बर्वे (रा.सिध्दार्थ नगर) हे बापलेक जखमी झाले आहेत. याप्रकरणी आकाश बर्वे या युवकाने तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.१२) रात्री बर्वे बापलेक आपल्या घरात असतांना संशयीत तेथे आला व त्याने किरकोळ कारणातून वाद घालत मावस भाऊ आकाश व काका भगवान बर्वे यांच्यावर चॉपरने हल्ला चढविला. या घटनेत बर्वे बापलेक जखमी झाले असून अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.
…….
युवकाची आत्महत्या
नाशिक : विषारी औषध सेवन करून मालेगाव स्टॅण्ड भागात राहणा-या २२ वर्षीय तरूणाने आत्महत्या केली. युवकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
शुभम प्रदिप घोरपडे (२२, रा. दिंडोरी) असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम याने मंगळवारी (दि.१३) सकाळी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते.ही बाब लक्षात येताच काका संदिप घोरपडे यांनी त्यास तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल केल असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.