नाशिक – गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या कालिदास कलामंदिरात क्रांतिसूर्य या नाटकाचे सादरीकरण आज (३ जानेवारी) होत असून या निमित्त या नाट्यगृहात पडदा उघडणार आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, ३ जानेवारी हा दिवस शासनाने महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे.या निमित्त सुरभी थिएटर प्रस्तुत,जोश फाऊंडेशन आयोजित या नाटकाचा प्रयोग होणार आहे, अशी माहिती या नाटकाचे सूत्रधार योगेश कमोद यांनी दिली.
महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांनी केलेली समाजसुधारणा व मागासवर्गीय समाजातील मुलींना शिक्षण देताना कोणत्या अडचणींवर कशी मात केली.या विषयावर हे नाटक हिंदी भाषेत सादर करण्यात येणार आहे.
राजेश शर्मा यांनी हे नाटक लिहून दिग्दर्शित केले आहे. संगीतकार दिनकर दांडेकर यांनी संगीत दिग्दर्शन केले आहेत. नेपथ्य शैलेंद्र गौतम,प्रकाश योजना रवी रहाणे करणार आहेत.दत्ता जाधव रंगभूषा तर संतोष झेंडे वेशभूषा करणार आहेत.
३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता विनामूल्य होणाऱ्या या प्रयोगाला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत,बाजीराव तिडके यांनी केले आहे.
नाशिकचे ४० कलावंत हे क्रांतिसूर्य नाटक सादर करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही समाजजागृती करणार असल्याचे या नाटकातील कलावंतांनी सांगितले. कोरोनासंदर्भात असलेले सर्व नियम पाळून या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.