नाशिक – जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब असून पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर व्यापारी सुतासारखे सरळ होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. शेतकर्यांना फसवणाऱ्यांविरोधात ग्रामीण पोलिसांकडून व्यापक मोहिम राबवण्यात येत आहे. यंदा आतापर्यंत जिल्हाभरातून ४४५ शेतकर्यांच्या तक्रारी आल्या आहेत. यापैकी २ कोटी रूपये पोलीसांनी शेतकर्यांना परत मिळवून दिले आहेत. तर ६९ व्यापार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ९५ व्यापारी शेतकर्यांचे पैसे परत देण्यास तयार असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आडगाव ग्रामिण पोलीस मुख्यालय येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. पाटील म्हणाले,
शेतकरी फसवणूक व अन्य गुन्ह्यांत संघटीत टोळ्या असण्याची शक्यता अधिक आहे. परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी अशा व्यापर्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ही मोहिम अधिक गतीमान करण्यात येणार आहे. शेतकर्यांचा विश्वास संपादीत करून फसवणूक करणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे गुन्हे रोखणे व शेतकर्यांना त्यांचे कष्टाचे पैसे मिळवून देण्यास प्राधान्य राहणार आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर तुरूंगातून पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपींमुळे जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या काही प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. अशांवर स्वतंत्र पथकांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. इतर राज्यातून जिल्ह्यात येऊन गुन्हे करणार्या आंतरराज्य टोळ्यांकडेही आमचे लक्ष असणार आहे. असे गुन्हे रोखतानाच महामार्गांवरील लूटमारीच्या घटनांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नाशिकमधील गुन्हेगारीची पद्धत समजून घेतली जाईल. या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी प्रसंगी कायद्याचा कठोर वापर केला जाईल.
पोलिसांसाठी कोविड सेंटर
जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी माझे कुटुंब असून त्यांची सुरक्षितता माझी जबाबदारी आहे. त्यामुळे पोलिसांसाठी आडगाव येथे १५० खाटांचे कोविड केअर सेंटर सज्ज करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.
बातमी आवडली