नाशिक – खरीप हंगामातील पीक कर्ज वितरणाच्या अखेरच्या मुदतीपर्यंत जिल्ह्यात तब्बल २ हजार २७१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. गतवर्षीपेक्षा जवळपास ६५८ कोटी रुपयांचे अधिक पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. कोरोनामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना या कर्जपुरवठ्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांमध्ये आपण २ हजार २७१ कोटी रुपयांचा टप्पा पहिल्यांदाच पार केल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले की, यावर्षी खूप आव्हानात्मक परिस्थितीत खरीप पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. कारण या काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने आपल्या जिल्ह्यात इतरांपेक्षा प्रदीर्घ काळ आचारसंहिता लागू होती. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचे पैसे खूप उशीरा प्राप्त झाले. त्याचबरोबर कोरोनासारख्या काळातही आपण या सगळ्यावर मात करुन जास्तीत कर्ज वितरणावर भर दिला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
खरीप कर्ज गतीने होण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी वेळोवळी आढावा घेतला. तसेच सर्व बँकर्स तसेच बॅकेचे कर्मचारी, संपूर्ण महसूल यंत्रणा, सहकार विभागाची यंत्रणा अनेक शासकीय विभाग यात हिरीरीने सहभागी झाले. जिल्हाधिकारी स्वतः दर आठवड्याला सर्व अतीवरिष्ठ बँकर्स ची बैठक घेत असल्याने या संपूर्ण कामात सातत्य राहिले. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून शेतकऱ्यांना आपण अधिक चांगले कर्ज वितरण करु शकलो आहे. जिल्हा बँकेने आपले उद्दीष्टापेक्षाही जास्त कर्ज वितरण केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, युबीआय या सर्व बँकानी खूप चांगले काम केले आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजने मध्ये सुरवातीला खूप मागे असलेल्या जिल्हा बँकेने २२१ कोटी पर्यंत मजल मारली आहे. राज्यातही पहिल्या चार पाच जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा क्रमांक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. खरीपाप्रमाणेच रब्बी पीक कर्ज वितरणाची रचना करण्यात येणार आहे. खरीपाच्या अनुषंगाने कर्ज वितरणाची रचना तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रब्बीच्या हंगामातही कर्ज वितरण चांगले राहिल, अशी ग्वाही मांढरे यांनी दिली.
गतवर्षीपेक्षा १७ टक्के अधिक कर्ज वितरण
खरीप पीक कर्ज वितरणाचे गेल्यावर्षी ३ हजार १४७ कोटी उद्दीष्टे होते आणि कर्ज वाटप १ हजार ६२३ कोटी इतके झाले होते. यावर्षी ३ हजार ३०० एवढे उद्दीष्टे असून कर्ज वितरण २ हजार २७१ कोटी इतके झाले आहे. वाढीव उद्दिष्ट असून व परिस्थिती प्रतिकूल असूनही गेल्यावर्षी पेक्षा १७ टक्के अधिक कर्ज वितरण झाले आहे. या कर्ज वितरणात एनडीसीसी बँक, बॅक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने चांगल्या प्रकारे कर्ज वितरण केले आहे. तर एनडीसीसी, बँक ऑफ इंडिया व युनाटेड बँक ऑफ इंडियाने आपल्या उद्दीष्टापेक्षा अधिक कर्ज वितरण केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी दिली. बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उद्दीष्टपूर्ण करण्याऱ्या बँकाचे व त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.