नवी दिल्ली – जुन्या ट्रॅक्टरमध्ये आता सीएनजी किट बसवता येणार आहे. होय…ही माहिती दिली आहे, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच. सीएनजी ट्रॅक्टरचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी झालं. या ट्रॅक्टरचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शेतकरी लवकरच जुन्या ट्रॅक्टरमध्ये सीएनजी किट बसवू शकतील. याबाबत लवकरच जाहीर केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
शेतीत ट्रॅक्टर वापरण्यासाठी तासाला सरासरी ४ लिटर डिझेल लागते. आणि त्याचा खर्च ७८ रुपये प्रतिलिटरनुसार ३१२ रुपये होते. सीएनजी ट्रॅक्टर चालवण्यासाठी ४ तासात १८० रुपये खर्च अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना वर्षाला एक लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो, असा अंदाज आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं सीएनजी ट्र्रॅक्टरचे मानक निश्चित केले आहेत, त्यानुसार बाजारपेठेत ट्रॅक्टर उपलब्ध होतील. ट्रॅक्टरमध्ये सीएनजी किट बसवल्यानंतर सीएनजीच्या इतर वाहनांप्रमाणे सुरुवातीला ते सुरू करण्यासाठी डिझेलची गरज भासू शकेल, त्यानंतर ते सीएनजीवर चालतील, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
मेक इन इंडियाअंतर्गत सीएनजी किट तयार केले जात आहेत. शेतीमध्ये वापरली जाणारी इतर साधनं बायो सीएनजीमध्ये रूपांतरीत करण्याची योजना आहे, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.
ट्रॅक्टरमुळे सर्वाधिक प्रदूषण
देशात जवळपास ६० टक्के कार, ट्रक, बस आणि ट्रॅक्टर डिझेलवर चालतात. एकूण डिझेलपैकी १३ टक्के ट्रॅक्टर, शेतीची उपकरणं आणि पंपसेटसाठी वापरलं जातं. डिझेल वाहन ७-८ पेट्रोल वाहनांइतके प्रदूषण पसरवतं. म्हणजेच ट्रॅक्टर इतर वाहनांपेक्षा जास्त प्रदूषण पसरवतं. कारण ट्रॅक्टरमध्ये कारपेक्षा अधिक शक्ती असते.