नवी दिल्ली – आजच्या धावपळीच्या काळात सुदृढ आरोग्याचे महत्व सर्वांनाच जाणवत आहे. हृदयाची आणि श्वसनाची गती या दोन गोष्टी आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वात महत्वाच्या ठरतात. आता आपल्याला मोबाइल फोनद्वारे यावर कायम लक्ष ठेवता येणार आहे. गुगल एका खास फिचरवर काम करत असून लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
या फीचरच्या मदतीने नागरिक सेलफोनचा वापर करून हृदय गती आणि श्वसन प्रमाण मोजू शकतील. पुढील महिन्यात गुगल हे वैशिष्ट्य आणू शकते आणि ही वैशिष्ट्ये गुगल फिट अॅपद्वारे पिक्सेल फोनमध्ये उपलब्ध असतील. गुगल हेल्थचे संचालक स्वेतक पटेल म्हणाले की, गुगल फिट तुम्हाला तुमच्या फोनचा कॅमेरा वापरुन हृदय गती आणि श्वसन प्रमाण मोजू देईल.
श्वसनाचे प्रमाण मोजण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या समोर फोनचा फ्रंट फेसिंग कॅमेरा धरावा आणि त्यानंतर श्वास घेण्याची प्रक्रिया सुरू करावी. त्याच वेळी, हृदय गती मोजण्यासाठी व्यक्तीने फक्त फोन मागील कॅमेरा लेन्सवर बोट ठेवले पाहिजे. परंतु कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की, हे वैशिष्ट्य वैद्यकीयदृष्टया योग्य आरोग्य मूल्यांकन करण्यासाठी नाही, त्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.