नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाट्यगृह उघडण्यास परवानगी नसल्याने नाशिकच्या प्रथमेश जाधवने घराच्या गच्चीवर रंगमंच साकारला आहे. या खुल्या रंगमंचावर आतापर्यंत दहा यशस्वी प्रयोग झाले असून मुंबई येथील अकादमी थिएटर आर्ट, मुंबई यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात प्रथमेशच्या कामाची दाखल घेतली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अकादमी थिएटर आर्ट, मुंबई यांचे तर्फे ऑनलाईन चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. कोरोनानंतर नाट्यगृह सुरु झाल्यावर नव्या थिएटरची पद्धत कशी असावी, त्यासाठी काय खबरदारी घ्यावी या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. भारतसह देशातील नाट्यक्षेत्रात काम करणारे ७०० रंगकर्मी यात सहभागी झाले होते. नाट्यक्षेत्रापुढे उभे असलेले आव्हान, नाट्यगृह सुरु झाल्यावर मिळणारी प्रेक्षक पसंती अशा नानाविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यात नाशिकच्या प्रथमेश जाधव याने घराच्या गच्चीवर साकारलेल्या खुल्या रंगमंचाची दखल घेतली गेली. कोरोनाच्या काळात नाट्यक्षेत्राला अल्पविराम न लावता त्यावर खणखणीत तोडगा शोधून काढल्यामुळे प्रथमेशच्या कामाचे कौतुक करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या अकादमी थिएटर आर्टस् विभागाचे मंगेश बनसोडे यांनी प्रथमेशच्या कामाचे कौतुक केले. मुंबई, पुण्यातील कलाकारांना हेवा वाटावा असे काम प्रथमेशने केले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.