कळवण – गाव खेड्यातून नामशेष होत असलेल्या बैलगाडीचे आकर्षण आजही कायम असल्याने आता तिची प्रतिकृती शोपीस म्हणून घरे, कार्यालय व इतर अनेक ठिकाणी दिसू लागली आहे. यांतील बहुतांश कलात्मक बैलगाड्या देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील विजय जाधव यांनी बनवल्या आहेत. त्यांच्या या कलाकृतीला परदेशातून मागणी होऊ लागली आहे. खुंटेवाडीची बैलगाडी सातासमुद्रापार जाऊ लागल्याने जाधवांच्या या विजयचे कौतुक होत आहे.
शेतकऱ्यांच्या जगण्याचा कधीकाळी बैल हा एकमेव आधार होता आणि बैलगाडी हेच साधन प्रत्येक कामासाठी वापरले जात असे. परंतु कालानुरूप बैल व गाडी मागे पडत गेले असले तरी त्यांच्या सोबतच्या आठवणी मात्र प्रत्येकाच्या मनात कायम आहेत. श्री.जाधव हे तयार करत असलेल्या बैलगाडीची प्रतिकृती इतकी लोभस व आकर्षक आहे की प्रत्येकजण तिच्या मोहात पडल्याशिवाय राहणार नाही . यामुळेच या बैलगाडींना देशांतर्गत तर मागणी आहेच पण आता परदेशातूनही मागणी होऊ लागल्याने ती ग्लोबल झाली आहे.
ओमान, झांबीया या देशांत बैलगाडी पाठवल्या असून मलेशिया व इतर काही देशांतून बैलगाडी पाठवा असे संदेश श्री.जाधव यांना येत आहेत. बेळगाव, गुलबर्गा (कर्नाटक), तामिळनाडू, केरळ, पंजाब, छत्तीसगड यांच्यासह पुणे, मुंबई, रत्नागिरी, बुलढाणा, औरंगाबाद, सातारा, नाशिक आदी ठिकाणी आतापर्यंत पाच हजार पेक्षा जास्त नग पोहोच झाले आहेत. युट्यूब चॅनेल, फेसबुक, व्हाट्सअप यावरून या कलाकृतीची जाहिरात केली जाते. ओमानमधून मोठी ऑर्डर मिळणार असल्याने कामाला गती दिली जात आहे. या कामात त्यांना पत्नी वंदना, मुलगा प्रणव यांचे सहकार्य लाभत आहे.
सागवानी लाकूड, उत्कृष्ट दर्जाचे एमडीएफ प्लाय, फायबरचे बैल व शेतकरी कुटुंब, पितळेची चाकांची धाव व घुंगरु यातून ही बैलगाडी साकारली आहे. सुक्ष्म कोरीवकाम, रंगरंगोटी, आखीव-रेखीव, प्रमाणबद्ध व कुंदन नक्षीकाम असल्याने ही कलाकृती प्रत्येकाच्या नजरेत भरते. लहानमोठ्या तीन-चार आकारात बैलगाडी बनवली जात असली तरी 20 इंच लांब, 10 इंच रुंद व 8 इंच उंची असलेल्या मध्यम आकाराच्या बैलगाडीला सर्वाधिक मागणी आहे. पूर्ण संचाची किंमत पाच हजार असली तरी परदेशात पाठवताना 550 रुपये प्रतिकिलो खर्च वाढतो. तोफ ठेवलेली बैलगाडी, घोडा, चिमणींची घरटी, शैक्षणिक साहित्य व इतर विविधांगी लाकडी साहित्य ते बनवतात. त्यांच्या या कलेची दखल घेत त्यांना नवउद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
“हे उत्पादन आपल्या देशातील कलात्मक आणि शेतीचा समृद्ध वारसा प्रतिबिंबित करते. सजावटीच्या उद्देशाने ही हस्तकला घरात, कार्यालयात ठेवण्यासाठी तसेच संस्मरणीय भेट देण्यासाठी या शोपीसला परदेशातुनही मागणी वाढल्याने आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो.”
–विजय एस. जाधव, संचालक विलास क्रिएशन्स, खुंटेवाडी
” मैने जब युट्यूबपर विजय की बैलगाडी का मॉडेल देखा तो उनका परफेकट काम मोहित कर गया. यह ट्रॅडिशनल चीज मुझे बहुत पसंद आई।”
-प्रमोद नायर, ओमान (मस्कत)
” खुंटेवाडीची बैलगाडी परदेशात जाऊ लागल्याने आमच्या गावाची ओळख वाढू लागली आहे. विजय जाधवांच्या कलाकारीचा आम्हाला अभिमान आहे.”
-भाऊसाहेब पगार, उपसरपंच, खुंटेवाडी, ता. देवळा