नाशिक – कोरोनाशी संबंधित एक दिलासादायक बातमी आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या बाळाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून या बाळावर उपचार करण्यात आले. त्यात डॉक्टरांना यश आले आहे.
शहरातील अशोका मेडिकोव्हर या हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यांच्या बाळावर उपचार सुरू होते. या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. आई मार्फत बाळाला लागण झाल्याचे संबंधित डॉक्टरांनी स्पष्ट केले. या बाळावर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला. त्यात डॉक्टरांना यश आले आहे. वेळीच प्लाझ्मा उपलब्ध असल्याने बाळाला जीवनदान मिळाले, अशी माहिती अशोका मेडिकोव्हरचे सुशील पारख यांनी दिली आहे.
दाखल करतेवेळी बाळाची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. फुफ्फुसे ७० टक्के काम करत नसल्याने तात्काळ बाळावर उपचार सुरु करण्यात आले. परंतु प्लाझ्मा थेरेपीमुळे बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. पारख यांच्या मते उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये पहिल्यांदाचं २ महिन्याच्या बाळाला प्लाझ्मामुळे जीवनदान मिळाले आहे. त्याचप्रमाणे आठवड्याभरापासून बाळाच्या प्रकृतीकडे वेळोवेळी लक्ष दिले जात आहे.
बाळाने पूर्णपणे कोरोनावर मात केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचा जास्त धोका असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी असे ते म्हणाले. तसेच कोरोनावर मात केलेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.