मुंबई – ‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्हीवरील लोकप्रिय शो असून त्यात आता तिसरा उमेदवार करोडपती झाला आहे. विशेष म्हणजे हा तिसरा उमेदवार देखील महिला आहे. यापूर्वी आणखी दोन महिलांनी करोडपती होण्याचा मान पटकावला आहे.
या तिसऱ्या करोडपतीचे नाव आहे अनुपा दास. छत्तीसगड येथे राहणाऱ्या अनुपा या शिक्षिका आहेत. खूप संघर्ष करून या शोमध्ये त्या आल्या आणि करोडपती बनून गेल्या. १ कोटी जिंकल्यानंतर ७ कोटींची त्यांना जो जॅकपॉट प्रश्न विचारण्यात आला होता, त्याचे योग्य उत्तर त्यांना माहीत होते, पण कोणतीही लाईफलाईन शिल्लक नसल्याने त्यांनी खेळ सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
१ कोटींसाठी विचारण्यात आलेला प्रश्न असा
१८ नोव्हेंबर १९६२ रोजी लद्दाख येथील रेजांग ला येथे शौर्य गाजवल्याबद्दल कोणाला परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले ?
ए. मेजर धन सिंह थापा
बी. लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापोर
सी. सुभेदार जोगिंदर सिंह
डी. मेजर शैतान सिंह
याचे योग्य उत्तर मार्जार शैतान सिंह असे होते. ते देताना अनुपा थोड्या साशंक होत्या पण लाइफलाईनच्या सहाय्याने त्यांनी योग्य उत्तर देत एक कोटी रुपये जिंकले.
त्यानंतर त्यांना सात कोटींचा प्रश्न विचारण्यात आला. तो असा
रियाज पुनावाला आणि शौकत दुकानवाला या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे?
ए. केनिया
बी. संयुक्त अरब अमिराती
सी. कॅनडा
डी. इराण
याचे योग्य उत्तर होते संयुक्त अरब अमिराती. याचे उत्तर अनुपा यांना माहित होते. पण सगळ्या लाईफलाईन संपल्याने कोणताही धोका न पत्करता त्यांनी खेळ सोडण्याचे ठरवले. त्यानंतर जेंव्हा त्यांना प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगण्यात आले, तेंव्हा त्यांनी दिलेले उत्तर बरोबर होते.
या शो मधून जिंकलेली एक कोटींची रक्कम अनुपा आपल्या आईच्या आजारपणावर खर्च करणार आहेत. त्यांच्या आईला कॅन्सर आहे. या शो मध्ये १ कोटी जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आईला अनुपा यांच्या विजयाची बातमी दिली.
अनुपा सांगतात की, या शो मध्ये येण्यासाठी मी तब्बल २० वर्षे प्रयत्न करते आहे. सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांना देखील मी हा शो बघण्यासाठी सांगते.