सायकलस्वार महिलेचा विनयभंग
नाशिक – सायकलीस्वार महिलेचा दुचाकीस्वाराने विनयभंग केल्याची घटना कोशिकोनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी स्वाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर महिला आपल्या मैत्रिणीसमवेत मंगळवारी (दि.२२) सायकलवर फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडली होती. युफोरिया जिम समोरून दोन्ही मैत्रीणी वेगवेगळ्या सायकलींवरून प्रवास करीत असतांना पाठीमागून आलेल्या अज्ञात मोटारसायकलस्वाराने पिडीतेचा विनयभंग केला. या नंतर संशयित सीटी सेंटर मॉलच्या दिशेने भरधाव वेगात पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले असून अधिक तपास उपनिरीक्षक शिवाजी सोनवणे करीत आहेत.
घरातून सोनसाखळी लंपास
नाशिक : घरातील देव्हाऱ्यात ठेवलेली सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पोकार कॉलनीत घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत राजेंद्र बरडिया (२७ रा.धनवर्षा छाया,साईनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बरडिया यांनी आपल्या गळ््यातील सुमारे ८२ हजार ४८५ रूपये किमतीची सोनसाखळी घरातील देव्हाºयाच्या ड्राव्हर मध्ये ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (दि.२१) रात्री घरात प्रवेश करून देवीचे पेंडल असलेली सोनसाखळी चोरून नेली. अधिक तपास हवालदार शेवरे करीत आहेत.
कारखाना आवारातून दुचाकी चोरी
नाशिक – कारखाना आवारात पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील कृष्णा पेन्स प्रा.लि. या कारखान्यात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल प्रकाश झवर (रा.बिग बाजार जवळ,ना.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. झवर गेल्या शुक्रवारी (दि.११) कामानिमित्त कृष्णा पेन्स या कारखान्यात गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची ज्युपिटर (केएल ३९ एल ५५०६) चोरट्यांनी पळवून नेली. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.
दुचाकी घसरल्याने वृद्ध ठार
नाशिक – भरधाव दुचाकी घसरल्याने ६२ वर्षीय वृध्दाचा मृत्यु जाला. हा अपघात नाशिक पुणा मार्गावरील दत्तमंदिर सिग्नल परिसरात झाला होता. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
चंद्रकांत धोंडीराम गांगुर्डे (रा.राहूलनगर,टाकळीरोड गांधीनगर) असे दुचाकी घसरल्याने मृत्यु झालेल्या वृध्दाचे नाव आहे. गांगुर्डे गेल्या शनिवारी (दि.१९) आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. दत्तमंदिर सिग्नल परिसरात भरधाव दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.
झाडावरून पडल्याने तरूणाचा मृत्यू
नाशिक – झाडावरून पडल्याने २५ वर्षीय तरूणाचा मृत्यु झाला. ही घटना जुने नाशिक परिसरातील कोळीवाडा भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
राजेंद्र बाळू कातकाडे (रा.कोळीवाडा) असे मृत तरूणाचे नाव आहे. कातकाडे गेल्या बुधवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास घराशेजारील झाडावर चढला होता. यावेळी अचानक फांदी मुडल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्याच्या कमरेस गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांने त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार दळवी करीत आहेत.