नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्यात ४ डिसेंबर रोजी संसदेत विविध पक्षांच्या नेत्यांसमवेत देशातील कोव्हिड -१९ च्या स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी ऑनलाईन (आभासी ) बैठक बोलावली आहे. यासाठी संसदीय कामकाज मंत्रालयाच्या वतीने विविध पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. तसेच या बैठकीत आगामी संसदेच्या अधिवेशनाबाबत देखील चर्चा होऊ शकते.
विशेष म्हणजे या वेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन कोरोना संक्रमणाची स्थिती पाहता अद्याप जाहीर झाले नाही. सदर अधिवेशन हे पुढील वर्षी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकत्र केले जाऊ शकते. पंतप्रधानांसमवेत होणाऱ्या शुक्रवारच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र सरकारच्या वतीने संसदच्या आगामी अधिवेशनाविषयी माहिती देण्यात येऊन विरोधी पक्षांकडून काही सूचनाही जाणून घेण्यात येतील.
दरम्यान, संसदीय कामकाज मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता संसदेत विविध पक्षांच्या नेत्यांशी कोव्हिड -१९ च्या सद्यस्थितीबद्दल चर्चा करतील. या आभासी बैठकीत पंतप्रधान हे सर्व पक्षांच्या नेत्यांनाही लशीच्या चाचणीपासून ते उपचारांपर्यंतच्या विविध सुविधांबाबत आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती देतील. या बैठकीत लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहात विविध पक्षांचे नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. माजी आरोग्यमंत्री, संसद सदस्य यांनाही बैठकीत आमंत्रित केले जाऊ शकते. संसदीय कार्यमंत्री यांच्यासह भाजपा अध्यक्ष व माजी आरोग्य मंत्री जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आदि यावेळी उपस्थित असतील. तसेच संसदीय कार्य मंत्रालयाच्या बैठकीसाठी विविध पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्यात येत आहे.