नवी दिल्ली – कोरोना महामारीविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून देशात लसीकरण अभियान सुरू आहे. या अभियानासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लसींना मान्यता दिलीआहे. बाजारातील किमतींच्या तुलनेत एसआयआय सरकारला कमी किमतीत कोविशील्ड लसीचा पुरवठा करत आहे. त्याच्या किमती आणखी कमी करण्यात आल्या आहेत. कोविशील्ड लसीची नवी किंमत २०० रुपयांपेक्षा कमी झाल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, कोविशील्ड लसीची किंमत पुन्हा ठरवण्यात आली आहे. आता प्रतिडोस २०० रुपयांपेक्षा कमी किंमत असेल. सरकारने नव्या दरांबाबत अधिक माहिती दिली नसली तरी कोविशील्डची किंमत आता १५७ रुपये असू शकते असा दावा अनेकांनी केला आहे. तसेच खासगी रुग्णालयात लोकांना लसीकरणासाठीची किंमत कमी केल्याबाबतही सरकारने काहीही माहिती दिली नाही. सध्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात लसीकरण अभियान सुरू आहे. सरकारी रुग्णालयात मोफत लसीकरण सुरू आहे. मात्र खासगी रुग्णालयात लसीची किंमत २५० रुपये आहे.
१६ जानेवारीपासून लसीकरण अभियानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात आली. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण करण्यात आले. एक मार्चपासून ६० पेक्षा अधिक वय असलेल्या आणि ४५ वयाहून अधिक इतर आजार असलेल्या रुग्णांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. गुरुवारी दुपारी एक वाजेपर्यंत कोविड लसीकरणाचे २,५६,९०,५४५ डोस देण्यात आले. यामध्ये ६७,८६,०८६ ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ४५ ते ५९ वयाच्या लोकांचा समावेश आहे.