पुणे – सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्यावतीने निर्माण केल्या जात असलेल्या कोविशिल्ड या लससाठी येत्या २ आठवड्यात आम्ही तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करणार आहोत. त्यानंतर ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे कोविशिल्ड ही लस पुढील महिन्यातच उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटला आज सायंकाळी भेट दिली. त्यांनी या लशीच्या उत्पादन, वितरण यासंबंधीची विस्तृत माहिती घेतली. या भेटीनंतर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पंतप्रधान हे भेटीनंतर अत्यंत समाधानी आहेत. कोविशिल्डची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. अद्याप एकाही स्वयंसेवकाला कुठलाही त्रास झाल्याचे दिसून येत नसून उलट त्यांची प्रतिकारक्षमता वाढत आहे. त्यामुळे या लसीसाठी आम्ही येत्या दोन आठवड्यात तातडीच्या परवान्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज करणार असल्याचे पुनावाला म्हणाले.
भारताला प्राधान्य
लसीचे उत्पादन हे पुणे आणि माद्री येथे केले जाणार आहे. त्यासाठी दोन्ही प्रकल्पांमध्ये सज्जता करण्यात आली आहे. उत्पादन सुरू होताच भारताला प्राधान्य दिले जाणार आहे. केंद्र सरकार किती डोस खरेदी करेल, हे अद्याप निश्चित नसले तरी ३०० ते ४०० दशलक्ष डोस आम्ही येत्या जुलैपर्यंत उपलब्ध करुन देऊ. भारतानंतर अफ्रिकन देशांना लसीचा पुरवठा केला जाईल, असे पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे.