कोविड -१९ च्या संकटकाळात गांधींचे तत्वज्ञान
हेडिंग वाचून आश्चर्य वाटले ना! पण, महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान कोरोनाच्या काळातही उपयोगी ठरणारे आहे. ते कसे याचा उलगडा करणारा हा लेख….
जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या गांधीजींचे तत्वज्ञान अतिशय महत्वाचे आहे. आपण हे जाणतोच की कोरोनाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. पुन्हा एकदा गांधी विचार आणि तत्वे यांवर विचार करण्याची संधी या कोरोनाने दिली आहे. स्वातंत्र्यापूर्वी देशाला कोणत्या दिशेने जावे लागेल याबद्दलची गांधीजींची तत्वे सर्वज्ञात आहेत. सध्याच्या काळात पुन: गांधीवादी तत्त्वांची अंमलबजावणी करण्याची गरज भासू लागली आहेत.
जसे की,
सर्वोदय – सर्वांची काळजी किंवा कल्याण
भारताचे पंतप्रधान सुद्धा “सबका साथ सबका विकास” याची घोषणा देतांना आपल्याला दिसतात तीच सर्वोदयाची संकल्पना व सिध्दांत गांधीजींनी चालवली होती व ग्राम विकास कार्याला सुरवात केली होती. गांधीजींच्या मते सर्वोदयचा अर्थ म्हणजे एक विचार प्रणाली, सर्वांचे कल्याण, सर्वांचा उदय असा होतो. या कोविड १९ या साथीच्या आजाराने आपल्याला खरंच गांधीजींच्या सर्वोदय म्हणजे सर्वांची काळजी, घरी राहून या रोगावर प्रतिबंध आणल्यामुळेच सर्वोदय या तत्वाचे पालन होणार आहे, हे पटवून दिले आहे.
अहिंसा
गांधीजींचे इतर सर्व गोष्टींपेक्षा अहिंसेच्या तत्वावर अधिक प्रेम होते. अहिंसा या धोरणाचे पालन करणे हे कुठल्या भित्र्या माणसाचे नाही तर उलट धाडसी माणसाचे लक्षण आहे, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे ही अहिंसात्माक चळवळ भारतातील सामान्य जनतेत प्रचंड लोकप्रिय झाली. त्याचबरोबर ते सत्याला पण खुप महत्व देत असत. अहिंसा हे साधन आहे व सत्य हे साध्य आहे. त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणारच यात काही शंका नाही अशी गांधीजींची विचारसरणी होती.
स्वदेशी
कोविड १९ दरम्यान लॅाकडाऊन मुळे तसेच असंख कामगारा्चे स्थलांतर झाले. त्यामुळे लघु व्यवसाय, हातावरती पोट असलेले कामगार, फेरीवाले तसेच लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर खुप मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येते आहे. या काळात पुन्हा गांधीजींच्या स्वदेशी या तत्वाचे पालन करण्याची वेळ आली आहे, असे दिसून येते आहे.
गांधीजींचा पाठिंबा हा नेहमीच विविध हस्तोद्योग, कला, लघु व्यवसायांना होता व ते लहान मुलांना स्वतः शिकवतही होते. आज त्यांच्या स्वदेशी या विचारांची बेरोजगारीचा भस्मासूर माजलेला असताना जाणिव होते आहे. बापूंनी 3H ही शैक्षणिक संकल्पना मांडली. त्यात Heart, Head & Hand यांचा समावेश होता. या तिन्ही बाबी एकत्र येऊन जो विकास होईल, तोच व्यक्तीचा आणि राष्ट्राचा विकास, असे ते म्हणत. त्यांची ही शिकवण आज खऱ्या अर्थाने लागू करण्याची वेळ आली आहे. त्यांचे विचार आजच्याच काळाशी सुसंगत आहेत असे नव्हे, तर कितीतरी पुढचा विचार करायला लावणारे आहेत. स्वदेशी वस्तू वापरल्यामुळे रोजगार निर्माण होता. त्यातूनच राष्ट्रीय आर्थिक उन्नती होणे सोपे होते. यावरून गांधीजींचे रोजगाराचे विचार काळाशी किती सुसंगत होते याची जाणीव होते.
शांततेचा शोध
जगामधील कित्येक सर्वात प्रभावशाली देशसुद्धा कोविड १९ मुळे हादरून गेले आहेत. मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी शांतता अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पण जगभराचा विचार करता धर्म आणि वर्चस्ववाद यामुळे संकटांना सामोरे जावे लागले. परिणामी, जागतिक अशांतता निर्माण झाली. त्यावेळी गांधीजींच्या विचारांची आठवण होणे मला वाटत अत्यंत गरजेचे आहे. जगामध्ये शांतता टिकून राहण्यासाठी गांधीजींचे विचार आजही समाजाला हातभार लावत आहेत. फक्त या विचारांचा स्विकार हा स्थळ, काळ आणि योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे.
‘खेड्याकडे चला’
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ग्राम विकासाचे स्वप्न पाहिले होते. खेड्यातील माणसाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल असा त्यांना विश्वास होता. एकीकडे वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, वाढती लोकसंख्या अशा अनेक गोष्टी पाहिल्या की गांधींचे ‘खेड्याकडे चला’ हे वाक्य आठवते. सध्याच्या व्यवस्थेत हताश, झालेला माणूस कुठेतरी नक्कीच शांतीच्या शोधात आहे. या दिशाहीन व्यवस्थेत सामान्य माणसाला उच्चांकस्थानी ठेऊन जगामध्ये शांतीचा मार्ग दाखविणाऱ्या गांधींची आठवण आज भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला होतेय. त्यांच्या विचारांकडे पुन्हा पाहण्याची गरज उत्पन्न झाली आहे ती यामुळेच. तसेच कृषी क्षेत्रामध्ये शासकीय आणि खासगी क्षेत्रात चांगल्या पगाराच्या संधी असतात जसे की, रोपाची जोपासना, लागवड, त्यासाठी त्यांना द्यावयाचे खतपाणी याबाबत मार्गदर्शन, वनौषधींची लागवड, जोपासना आणि उत्तमप्रकारे संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शनाच्या संधी असतात. त्यातून महात्मा गांधी यांच्या ‘खेडय़ाकडे चला’ या संदेशाची सत्यता दिसून येते.
“वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाणे रे”
चांगली कविता माणसाला संस्कार देते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. भक्ती साहित्याचा संस्कार त्यांना मिळाला नसता तर ते महात्मा गांधी बनले नसते. त्यांच्या निर्मितीमध्ये मुख्य भूमिका भक्ती साहित्याची आहे. माणसाच्या निर्मितीमध्ये तत्वज्ञान, विचारधारा इत्यादींचीही भूमिका असते. पण त्याच्यावर सर्वात खोलवर आणि सौम्य परिणाम होता तो म्हणजे कवितेचा. गांधींवर धर्माभिमानी कवींच्या प्रभावाची तपासणी करण्यासाठी त्यांचे जीवन-संदर्भ आणि लेखन पाहणे आवश्यक आहे. त्यांच्या मते धर्माचा अर्थ ‘आत्मबोध’ किंवा ‘आत्मज्ञान’ असा आहे.
धार्मिक आणि जातीय उन्माद वाढत असताना गांधीजींच्या आवाजात ‘वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाणे रे” म्हणजे “खरा वैष्णव तोच आहे जो इतरांच्या दु: खाला समजतो” हे ऐकतानाच त्यांनी सांगितलेला ‘आतला आवाज’ आपण शोधू लागतो. स्वतःला शोधा आणि आपाल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगला बदल करा यावर त्यांचा विश्वास होता.
स्वतःला बदललं तरच समाज बदलू शकेल आणि म्हणूनच बी द चेंज यु वॅाट टु सी इन द वर्ल्ड (Be the change you want to see in the world ) असं गांधीजी म्हणतात. तसेच शक्य तितक्या शोषण करणार्या प्रथांना दूर ठेवून गांधींनी आपल्या पर्यावरणाशी सुसंगत राहण्याचा वेळोवेळी सल्लाही दिला आहे.
निष्कर्ष
गांधींचे विचार आणि तत्त्वज्ञान आजही प्रासंगिक आहे, असे जाणवू लागले. दोन्ही बाजूंचा वस्तुनिष्ठ विचार केल्यास आणि द्वेष वाढत असतानाच्या आजच्या काळात गांधीजींचे विचारच तारू शकतील, असेही वाटते. कारण गांधीजींचे “An eye for an eye makes the whole world blind.”हे मत अतिशय चपखल आहे. बरोबर ना!