नाशिक – कोविड सारख्या कठीण काळात रा.स्व. संघाच्या प्रेरणेने समाजासाठी विविध कठीण कामे केलेली असून “कोविड दीपस्तंभ हेल्पलाइन” या नवीन उपक्रमाचा समाजाला मोठा लाभ होईल, असा विश्वास महापौर सतीश कुलकर्णी यांनी या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात व्यक्त केला.
रा. स्व. संघ जनकल्याण समिती, श्रीगुरुजी रुग्णालय व मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कोविड आपत्ती खूप मोठी आहे. सध्याच्या परिस्थितीत शासनाची जबाबदारी महत्वाची आहे. त्याबरोबरच रा.स्व. संघासारख्या स्वयंसेवी संघटना त्यात स्वतःहून अनेक जबाबदाऱ्या येतात, हे प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. अशा सर्व स्वयंसेवी संस्थांच्या कामात महानगरपालिका प्रशासन कायम पाठीशी आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सहकार्यातून सुरक्षितता हे ब्रीद घेऊन या सर्व संस्था व संघटनेचे काम करीत असल्याचे ज्येष्ठ सनदी लेखापाल हेरंब गोविलकर यांनी याप्रसंगी सांगितले. रुग्णसेवेचे व्रत विद्यार्थी अवस्थेपासून केले तर त्याचा पुढे उपयोग होईल असे आवाहन त्यांनी केले.श्रीगुरुजी रुग्णालयाचे अस्थिरोगतज्ज्ञ आणि या प्रकल्पाचे संयोजक डॉक्टर राजेंद्र खैरे यांनी कोविड काळात संघ विचारांच्या सर्व संघटनांनी केलेल्या औषध वाटप, शिधावाटप, जेवण वाटप, रुग्ण सहायता, रक्तदान, मृतांवरील अंत्यसंस्कार इत्यादी कामांचा आढावा घेऊन घेतला.
शहरात पसरत असलेल्या कोविडचे प्रमाण लक्षात घेऊन यापुढील समाजाची आवश्यकता म्हणून हे समुपदेशन व मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.या केंद्राद्वारे विविध परिस्थितीत जनसामान्यांच्या मनातील संभ्रम दूर करणे, मनोबल वाढवणे, उपचाराबाबत मार्गदर्शन करणे,रुग्ण सहायता इत्यादी कामे केली जातील, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पात आतापावेतो शंभर महिला व पुरुषांनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली असून त्यांचे काम सुरू झालेले आहे.
याप्रसंगी रा स्व संघ नाशिक विभाग संघचालक कैलास साळुंके, शहर संघचालक विजय कदम, श्रीगुरुजी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद धर्माधिकारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन मंदार ओलतीकर व सूत्रसंचालन सोनाली तेलंग यांनी केले.
येथे साधा संपर्क
दीपस्तंभ कोवीड मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रातून तपासणी केंद्रांची माहिती, औषध , डबा, ऑक्सिजन सिलिंडर, डॉक्टरांचे मार्गदर्शन, मानसोपचातज्ज्ञ डॉक्टरांद्वारे समुपदेशन इत्यादी सुविधांची माहिती मिळेल. 9422749989 आणि 9422759673 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.