टिकून आम्ही संकटातही पुस्तकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा
नाशिक – कोविड महामारीच्या काळात शिक्षकांनी विद्यार्थी कसे शिकते केले ते दर्शविणारे, सत्य-कथांचे एक प्रेरणादायक पुस्तक “टिकून आम्ही संकटातही हे सीके संस्थेतर्फे प्रकाशित होणार आहे,
या पुस्तकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा शनिवार ५ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आणि महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचे (MSCERT) संचालक दिनकर टेमकर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे फेसबुक आणि युट्युब वर थेट प्रसारण केले जाणार आहे. (FB Live असणार आहे.) या पुस्तकात नाशिक जिल्ह्यातील विशाल बोरसे, बालाजी नाईकवाडी, श्रीमती आशा चिने, श्रीमती कुंदा बच्छाव या ४ शिक्षकांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यात आली आहे.
या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिक्षकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन सिके संस्था व सिके संस्थेचे नाशिक जिल्हा मॅनेजर आकाश ढेपे यांनी संस्थेच्या वतीने केले आहे.
पुस्तकाबद्दल अधिक तपशील सांगताना, सीके संस्थेच्या संस्थापक व संचालक, श्रीमती अंजू सैगल यांनी सांगितले की, या पुस्तकातील कथांच्या माध्यमातून शिक्षकांना हिरो बनविण्याचा आमचा हेतू नाही. परंतु शिक्षकांच्या कार्यावर प्रकाश टाकताना, त्यांनी केलेली प्रचंड मेहेनत, एखाद्या वीरासारखी त्यांची धाडसी वृत्ती आणि त्यांच्या परिसरातील अत्यंत वंचित मुलांसाठी शिकणं शक्य करून दाखविण्याची जिद्द, त्यांची संवेदनशील मनोवृत्ती या सर्व गोष्टींचे कौतुक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
कोविडमुळे टाळेबंदी लागू झाली आणि त्यासोबत भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या. जगभरात शिक्षण ऑनलाईन झाले खरे, परंतू बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रकारच्या शिक्षणापर्यंत पोहोचता येत नव्हते. ग्रामीण आणि निम-शहरी शासकीय शाळांची परिस्थिती पाहून हे ठळकपणे जाणवले की विद्यार्थी शाळाबाह्य होत आहेत आणि एका अमर्याद शैक्षणिक नुकासानीला सामोरे जात आहेत.
सीके संस्था ही शैक्षणिक साहित्य तसेच पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवनातून शिक्षण निसटून जाऊ नये म्हणून, महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमधील शासकीय शाळांच्या शिक्षकांसोबत अविरतपणे कार्य करणारी, भारतातील शिक्षकांच्या व शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाचे उद्दिष्ट जोपासणारी ना-नफा तत्वावर चालणारी संस्था आहे. या समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी सीके संस्थेने गेले वर्षभर टीचर इनोव्हेटर प्रोग्रामच्या माध्यमातून शासकीय शाळांच्या शिक्षकांसोबत कार्य केले. या प्रयत्नांना शिक्षकांचीही सुरेख साथ लाभली. उदाहरणार्थ, श्रीमती कुंदा बच्छाव यांनी नाशिकमधील आनंदवली गावात आपल्या विद्यार्थ्यांसाठी २०० पुस्तकांचे फिरते वाचनालय सुरू केले. प्रमोद खांडेकर यांनी गडचिरोलीतील आडापल्ली गावात मुलांना खुल्या वर्गांमध्ये, सामाजिक अंतर पाळून शिकवण्यासाठी, गावकऱ्यांच्या घरांच्या भिंती काळ्या रंगाने रंगवून फळे म्हणून वापरल्या. कसारा येथील श्रीमती रोहिणी दांडगे यांनी मुलांच्या सुविधेसाठी रात्रीचे वर्ग घ्यायला सुरूवात केली, कारण फोन मुलांच्या पालकांकडे असत आणि पालक कामावरून रात्रीच घरी परतत. किंवा मुसारणे येथील पिनेश जाधव यांनी पालकांच्या साध्या मोबाइल फोनच्या स्पीकरफोनवरून दुर्गम आदिवासी भागातील मुलांना पाठ शिकविले.
श्रीमती चतुरा राव आणि श्रीमती रचना बिश्त-रावत यांच्यासारख्या नामांकित लेखिकांनी शिक्षकांच्या पंधरा सुंदर गोष्टी या पुस्तकात लिहिल्या आहेत. कोविड महामारीच्या काळात या शिक्षकांनी अनेक धडपडी करून आपल्या विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवले. श्रीमती अंकिता शाह यांनी पुस्तकाचे संपादन केले आहे, श्रीमती अनन्या ब्रोकेर पारेख यांनी यातील कथांचे सुंदर चित्रवर्णन केले असून पुस्तकाची मांडणी श्रीमती सौम्या जैन यांनी केली आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे आयुक्त विशाल सोलंकी यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
या कार्यकमात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या *लिंक्सवर* क्लिक करा :