नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा धोका अद्यापही कायम असून, नागरीकांनी काळजी घेण्याचं आवाहन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह, गुजरात, हरियाणा, केरळ, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि राजस्थान, या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. लसीकरणाची प्रक्रिया अडथळे न येता आणि पारदर्शी पद्धतीनं राबवली पाहिजे, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं आतापासूनच तयारी करणं आवश्यक असून, लसीच्या साठवणीसाठी शीतगृह उभारणीवर राज्यांनी आतापासूनच लक्ष द्यावं, असं पंतप्रधानांनी सांगितलं. करोना विषाणू बाधित रुग्णांचं प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी आणि मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावे, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं.