कोल्हापूर – संभाव्य पूरपरिस्थितीत नागरिकांच्या बचाव आणि मदत कार्यासाठी जिल्ह्यात आज आणखी दोन एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. जिल्ह्यात ५५ बोटी कार्यान्वित आहेत. एनडीआरएफची दोन पथके १५ जुलै रोजी जिल्ह्यात आलेली आहेत. आज आणखी दोन पथके जिल्ह्यात आली आहेत. प्रशासन ज्या सूचना देईल त्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन नागरिकांनी यावर्षी दक्षता घ्यावी. काल मुख्यमंत्री महोदयांनीही कोल्हापूर जिल्ह्यातील पाऊस, संभाव्य पुराचा धोका याबरोबरच अडीअडचणी संदर्भात सविस्तर माहिती घेतली. प्रशासन गेले पाच महिने कोरोनाच्या संकटात रात्रंदिवस काम करीत आहे. पुराच्या वेळीही नागरिक पाणी पाहण्यासाठी गर्दी करीत आहे. या गर्दीमुळे कोरोनाचे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कृपा करुन गर्दी करु नये. पूर पाहण्यास जाऊ नये असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. पथक प्रमुख शिवप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एक पथक २२ जवान २ बोटीसह शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे सकाळी रवाना झाले. मनोजकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखालील २२ जवान, २ बोटीसह कोल्हापूर शहरात तैनात आहे. आपत्तीमध्ये काम करण्यासाठी एनडीआरएफचे पथक सक्षम असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
नगरसेवकांची बैठक
पुराने बाधित होणाऱ्या महानगरपालिकेच्या १८ प्रभागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे. आयुक्तांनी याबाबत नियोजन केले असून तेथील सुविधांबाबतही संबंधित नगरसेवकांनी आढावा घ्यावा. निवारागृहात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांसाठी आरोग्य सेवेच्या सुविधेबरोबर आरोग्य किटचेही वाटप करावे, अशी सूचना पालकमंत्री यांनी आज केली. पुराने बाधित होणाऱ्या १८ प्रभागांच्या नगरसेवकांची जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी बैठक घेतली.